शिवसेना (उबाठा) नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांचे फेसबुक अकाउंट हॅक ; सायबर पोलिसांत तक्रार दाखल:

जळगाव: – शिवसेना (उबाठा) नेत्या आणि शैक्षणिक संस्थाचालक वैशालीताई सुर्यवंशी यांचे फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ मार्च रोजी हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुर्यवंशी यांच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड बदलण्यात आला होता आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हॅक झालेल्या कालावधीत हॅकरने अकाउंटवर ऐतिहासिक शिल्पे, नाणे आणि वास्तूंसंबंधी पोस्ट्स शेअर केल्या.

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे हॅकरचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्ड वापरणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करणे आणि अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.