भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये 3 किमीच्या स्पर्धेत 281, 5 किमीच्या स्पर्धेत 121 तर 10 किमीच्या स्पर्धेत 69 असे एकूण 472 महिलांनी यशस्वी सहभाग नोंदविला. रविवारी शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस सर्व महिला स्पर्धकांसाठी कौस्तुभ मंत्री यांनी वार्म अप सेशन घेतले. त्यानंतर ठीक सहा वाजता 5 किमी व 10 किमीची तर ठिक 6.15 वाजता 3 किमीच्या स्पर्धेत सुरुवात झाली. कोरोनेशन क्लब ते शहरातील जामनेर रोडवरील चोरवड पुल व तेथून पुन्हा मैदानावर परत असा 10 किमीचा मार्ग होता तर 5 किमीचे स्पर्धक नाहाटा कॉलेज जवळून व 3 किमीचे स्पर्धक अष्टभुजा माता मंदिरापासून मैदानावर माघारी फिरले.

यावेळेस स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेत सुरुवात करण्यासाठी वाहतूक विभागाचे प्रमुख उमेश महाले, माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर, डॉ. रती महाजन, सदिच्छादूत व प्रसिद्ध धावपटू कविता पाटील, डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारूलता पाटील यांची उपस्थिती होती.
कल्पना रसवंती जवळ लॉयन्स क्लब तर्फे, अष्टभुजा माता मंदिराजवळ जय झुलेलाल ग्रुपतर्फे, नाहाटा महाविद्यालयजवळ मनसब अलींतर्फे तर साईबाबा मंदिराजवळ नाना पाटील यांच्या पर्यावरण ग्रुपतर्फे महिला स्पर्धकांसाठी पेयजल, चॉकलेट, सरबत अशी व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे स्वयंसेवक टाळ्या वाजवून महिला स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करीत होते. यावेळी अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ व सद्गुरु ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य देखील स्पर्धकांचे स्वागत करीत होते. पोलीस विभागातर्फे रहदारीचे शिस्तबद्ध नियोजन यामुळे महिलांची धाव रस्त्याच्या एकाच बाजूने अधिक सुरक्षित झाली. आपली धाव पूर्ण झाल्यानंतर मैदानावर परतल्यानंतर गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जेव्हा स्पर्धकांना पदक बहाल करीत होत्या त्यावेळी आपण गेल्या दोन महिन्यांपासून करीत असलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याची कृतार्थ भावना महिलांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. सर्व स्पर्धक मैदानावर परतल्यावर स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेण्यात आला. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर भेल इंडियाचे प्रतिनिधी अबीद सर, माय फिटनेसचे प्रमोद धनगर, धावपटू कविता पाटील, डाॅ रती महाजन, डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारुलता पाटील, संजय कुकरेजा, अनंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
5 किमीचे विजेते:
प्रथम- जानवी रोझोदे (21 मिनिटे 36 सेकंद)
द्वितीय- निकिता खोले( 26 मिनिटे 11 सेकंद)
तृतीय- रिधिमा चौधरी (29 मिनिटे 29 सेकंद)
10 किमीचे विजेते:
प्रथम- तेजस्विनी ढाके (47 मिनिटे 22 सेकंद)
द्वितीय- वैशाली बडगुजर (59 मिनिटे 38 सेकंद)
तृतीय- ममता सपकाळे (60 मिनिटे 40 सेकंद)
रन यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संचालक म्हणून प्रविण फालक यांनी काम पाहिले. संपूर्ण मार्गाचे व स्वयंसेवकांचे नियोजन ब्रिजेश लाहोटी व प्रवीण वारके यांनी पाहिले. मैदानाच्या तयारीचे नियोजन प्रविण पाटील व पंकज कुलकर्णी यांनी केले. वाहन तळाचे नियोजन छोटू गवळी यांनी पाहिले. राहुल पाटील यांच्या टायनी स्टुडिओ सोबत फोटोग्राफीचे नियोजन सुयश न्याती, अभिराम मेहंदळे, दीपेश सोनार यांनी केले.
डॉ जगदीश अत्तरदे, डॉ सुयोग तन्निरवार यांनी वैद्यकीय विभाग सांभाळला तर डॉ रिया अग्रवाल यांनी फिजीओथेरपीच्या टीमचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले तर किर्ती मोतळकर यांचे संपूर्ण प्रक्रियेत विशेष सहकार्य लाभले.


