भुसावळ, (प्रतिनिधी ) – ता. ६ : बदलत्या काळाच्या गरजा ओळखून वस्त्रोद्योगाला लवकरच आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार आहोत अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. ते शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित नवरत्न पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.

याप्रसंगी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सरकारी वकील व शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड नितीन खरे, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या समारंभात सावकारे पुढे म्हणाले राज्यात रोजगार व उत्पन्न वाढवून देण्याची क्षमता असलेले माझे खाते असून पहिल्यांदाच ते स्वतंत्र खाते करण्यात आले आहे. पूर्वी ते पणन व वस्त्र उद्योग असे एकत्रित खाते होते. समाजात उत्कृष्ट काम करणारे लोकही असल्याने आज जग सुरू आहे त्यामुळे चांगले शोधून ते समाजासमोर आणणे आवश्यक आहे. प्रसार माध्यमे भरपूर असली तरी आधुनिक काळातही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता अद्यापही शाबूत आहे असे सावकारे म्हणाले. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांचेही यावेळी मनोगत व्यक्त केले . यावेळी १) आनंदा पाटील (पत्रकार), चंद्रकांत महाराज (समाज प्रबोधनकार) सतीश महाजन (रक्तदान सेवक), किशोर अंबोले (एसटी कर्मचारी), विवेक वणीकर (ज्येष्ठ छायाचित्रकार), मंगला पाटील, (महिला उद्योजक), दीपक अग्रवाल (पोस्ट ऑफिस कर्मचारी), अनिल साळवे (रेल्वे कुली रेल्वे स्टेशन), हमीद भुसावली (शायरीकार) यांना नवरत्न पुरस्कार सावकारे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. दैनिक आव्हान चे ज्येष्ठ संपादक प्रफुल्ल नेवे यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद आठवले, डॉ. जगदीश पाटील, सुनील आराक यांनी सूत्रसंचालन केले. सचिव हबीब चव्हाण, प्रोजेक्ट चेअरमन श्याम गोविंदा, उज्वला बागुल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.



