चांदवड :- येथील श्री.गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात पैठण येथील वेदशास्त्र संपन्न पुराणाचार्य डॉ.श्री प्रसाद महाराज भागवत
यांच्या प्रासादिक वाणीतून शनिवार दिनांक २१ डिसेंबर ते शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत श्रीमद् भागवत कथा संपन्न झाल्याची माहिती मंदिराचे पुजारी अमोल दीक्षित यांनी दिली.

धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे, या महिन्यात सूर्यकिरणे तिरपी पडतात. ज्यामुळे थंडी पडायला सुरुवात होते. वातावरण प्रसन्न असते आयुर्वेदिक शास्त्रानुसार या महिन्याला स्वास्थवर्धक मास असे म्हटले जाते; म्हणूनच भगवंताने मासानां मार्गशीर्षोऽहम्..असे भगवद्गीतेत म्हटले आहे या भगवद् वचनानुसार मार्गशीर्ष महिना हा भगवंताचेच स्वरूप आहे याचेच औचित्य साधून चांदवड येथील श्री.गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
भागवत सप्ताह काळात नारद चरित्र पासून ते गोकर्ण आख्यानापर्यंत विविध विषयांवर निरूपण विस्तृतपणे संपन्न झाले संत परिसा भागवत यांचे वंशज प्रसाद महाराज भागवत यांचे संस्कृत आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व,सुंदर भाषा शैली,उत्तम सादरीकरण यामुळे त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली मूळचे प्रतिष्ठान असलेल्या पैठण या क्षेत्री वयाच्या चौदाव्या वर्षी श्री प्रसाद महाराज यांनी पहिले भागवत केले. कांचिकामकोटी पीठाधीश्वर आद्य शंकराचार्य यांनी पुराणाचार्य ही पदवी देऊन सन्मानित केले आहे.


