यावल – शहरातील सुतार वाड्यातील शहरी विभागाच्या 76 क्रमांकाच्या अंगणवाडीतील पोषण आहारात बारीक पांढर्या अळ्या निघाल्यानंतर संतप्त पालकांनी अंगणवाडी सेविकेस जाब विचारत संताप व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी भुसावळ बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी अंगणवाडीस भेट देत पंचनामा केला. संबंधित ठेकेदार व पुरवठादारावर दोन दिवसात कारवाई करण्याची लेखी आश्वासन देण्यात आले.
शहरातील सुतारवाड्यातील 76 क्रमांकाच्या शहरी अंगणवाडीतील पोषण आहारांतर्गत देण्यात आलेल्या वरणात पांढर्या अळ्या आढळून आल्यानंतर संतप्त पालकांनी बुधवारी अंगणवाडीत जात सेविकेस जाब विचारत धारेवर धरले. दरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ अंगणवाडीस भेट देत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना घटनेची दखल घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार भुसावळ विभागीय शहरी अंगणवाडीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी भेट देत अंगणवाडीस पुरवलेल्या पोषण आहाराचा पंचनामा केला.
अंगणवाडीचा पोषण आहार कुणी शिजवला ? याचे उत्तर देताना वारंवार अंगणवाडी सेविका वेगवेगळे नाव सांगत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसात चौकशी करून संबंधित ठेकेदार व पुरवठादारावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पालकांना दिले. तक्रारकर्त्यांमध्ये बाळा कोळी, आकाश चचोपडे संजय नन्नवरे, चेतन आढळकर, दत्तात्रय कोळी, योगीता कोळी, माया कोळी, पुंडलिक बारी यांचा समावेश होता. अंगणवाडी पोषण आहारासंदर्भात दोन दिवसात कारवाई न केल्यास पालकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.



