भुसावळात भरदिवसा 23 लाखांची घरफोडी -दाम्पत्य लग्नाला जाताच चोरट्यांचा घरावर डल्ला ; वाढत्या चोर्‍यांनी घबराट ;

भुसावळ – शहरात जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास संथगतीने सुरू असतानाच कुटूंब गावातच लग्नातील मेहंदीच्या कार्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी बंद घरातून भर दिवसा 25 तोळे सोन्यासह रोकड मिळून आजच्या बाजार मूल्यानुसार सुमारे 23 लाखांचा ऐवज लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. भर दिवसा चोरीची ही घटना शिवशक्ती कॉलनी जवळील सोमनाथ नगरात सोमवारी दुपारी तीन ते रात्री दहा वाजेदरम्यान घडली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरातील लोखंडे वाडा, शिवशक्ती कॉलनीजवळील सोमनाथ नगरात सुमारे दहा वर्षांपासून इलेक्ट्रीशीयन अनिल हरी बर्‍हाटे हे सेवानिवृत्त शिक्षिका असलेल्या पत्नीसोबत वास्तव्यास आहेत. बर्‍हाटे यांच्या पुतण्याचे लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी शहरातील वांजोळा रोड, मिरची ग्राऊंड परिसरात असल्याने दाम्पत्य सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले.
बर्‍हाटे दाम्पत्याने काही वर्षांपूर्वी सोन्याची पोत, चैन, कानातले, डोरले असे एकूण 25 तोळ्यांचे दागिणे स्नानगृहातील कप्प्यावरील अडगळीत ठेवलेल्या खलबत्त्यात लपवून ठेवले होता. माहितगार चोरट्यांनी बर्‍हाटे दाम्पत्याच्या घराची मागची जाळी तोडून प्रवेश करीत आधी स्नानगृहात लपवलेले सोन्याचे दागिणे चोरले तसेच गोदरेज कपाटासह किचन ओट्यातील डब्यांमध्ये लपवलेले एकूण तीन लाख 80 हजारांची रोकडही लांबवली. दाम्पत्याने लपवलेल्या रोकडसह दागिण्यांची चोरट्यांना माहिती असावी व त्यातूनच त्यांनी हा मुद्देमाल चोरल्याचा यंत्रणेला संशय आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह खबर्‍यांच्या माध्यमातून पोलिसांकडून घरफोडीची उकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सोमवारी दिवसभरात मेहंदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बर्‍हाटे दाम्पत्य रात्री दहा वाजता सोमनाथ नगरातील निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी कुलूप उघडून घरात प्रवेश केला असता त्यांना किचन व कपाटातील साहित्याची फेकाफेक झाल्याचे व घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांना मोठा धक्का बसला. बाजारपेठ पोलिसांना सूचित केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली.