मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील बोदवड रस्ता ते प्रवर्तन चौकादरम्यान असलेल्या राजस्थान मार्बलजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील नगरपंचायत कर्मचारी ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली. महिनाभरात हा दुसरा अपघात असून या रस्त्यावर गतिरोधक नसल्याचा दुसरा बळी आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कर्मचारी मयूर रवींद्र महाजन व अतुल वराडे दोघे हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.एल. 5343) बोदवड रस्त्यावरील राजस्थानी मार्बल ते साई वॉशिंग सेंटरच्या दरम्यान जात असताना मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जाणार्या कार (क्रमांक एम.एच. 20 सी.एच.0546) ची जोरदार धडक बसली. त्यात नगरपंचायत कर्मचारी मयूर महाजन (33) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारासाठी जळगावकडे नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर अतुल एकनाथ वराडे (30) हे गंभीर जखमी झाले. अतुल वराडे हे मुक्ताईनगरातील सिंचन विभागात कार्यरत होते.
दरम्यान, मयूर महाजन हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होय. मयताच्या पश्चात आई, वडील दोन बहिणी, पत्नी, दोन वर्षाची लहान मुलगी आहे. मयूर महाजन यांच्या निधनामुळे मुक्ताईनगर शहरात शोककळा पसरली. चारचाकी चालक राम मोहन हंबर्डे (रा.मलकापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक सुरेश मेढे करीत आहेत.



