कराड – राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ 47 जागा मिळाल्या व पराभवाच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी निकालावर भाष्य केले. काल निकाल लागला अन् आज मी कराडमध्ये आलोय. असा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल, असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्यांना पुन्हा नव्यानं उभं करणं गरजेचं आहे. कर्तृत्वान पिढी उभारणं, हा माझा यापुढे कार्यक्रम राहील, असं शरद पवार म्हणाले.

आम्ही सत्तेत आल्यास योजना बंद करू, असा केला प्रचार
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास ही योजना बंद होईल, असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला त्यामुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केले, असे वाटते. दुसरीकडे या निवडणुकीत महिलांचे मतदान वाढले आहे, असे आकडेवारीवरुन दिसते. तो फायदा महायुतीला मिळाला आहे ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले, त्याचा फायदाही महायुतीला झाला.’
तो पर्यंत ईव्हीएमवर बोलणार नाही
निकालानंतर उद्धव ठाकरेंसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी निकालांवर संशय व्यक्त केला असून जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी या विषयावर काही बोलणार नाही. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शरद पवार निवृत्ती होणार? ही चर्चा सुरू झाली. त्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणतात, ’माझ्या निवृत्तीची वेळ विरोधकांनी सांगू नये, असे पवार यावेळी म्हणाले.


