शुक्रवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल लांबवणार्या परप्रांतीय त्रिकूटाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. सोनीपत सोनी सोलंकी (21), मकरानीबाई सुनील शिसोदिया (25), नसीबाबाई धनराज पवार (35) व एक अल्पवयीन (सर्व रा.कडार्या, ता.लखाडा, जि.उज्जैन, मध्य प्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

यावलकरांच्या सतर्कतेने संशयीत जाळ्यात
चौघांनी शुक्रवारी सायंकाळी बाजारातून मुस्तुफा खान यांचा मोबाईल चोरी केला व त्याचवेळी ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर यावल पोलिसांना पाचारण करण्यात आले. चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 94 हजार 98 रुपये किंमतीचे सहा मोबाईल आढळले. याप्रकरणी मुस्तफा खान मेहबूब खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.


