तरुणांना व्हिडिओ रील्स बनवणे पडले महाग : उपनगरीय ट्रेनच्या मोटरमनच्या कॅबमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल दोन तरुणांना अटक –

मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा दलाने दोन तरुणांना व्हिडिओ रील्स बनवण्याकरीता उपनगरीय ट्रेनच्या मोटरमनच्या कॅबमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल अटक केली
गुन्हेगारांना कडक चेतावणी देणारा दिला संदेश

मुंबई – दि १० – कसारा स्थानकावर थांबलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन व्यक्तींना मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) यशस्वीरित्या पकडले आहे.

राजा हिम्मत येरवाल (20) आणि रितेश हिरालाल जाधव (18, दोघे रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दि. 25.07.2024 रोजी कसारा स्थानकात प्लॅटफॉर्म 4 वर उभ्या असलेल्या उपनगरीय ट्रेन क्रमांक 95410 च्या मोटरमनच्या केबिनमध्ये एका आरोपीने प्रवेश केला आणि दुसऱ्या आरोपीने व्हिडिओ शूट केला, जो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता.

मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेलच्या सहकार्याने या दोघांना नाशिक येथून दि. 8.08.2024 रोजी पकडले. चौकशीदरम्यान, आरोपीने सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना CR NO.1200/24, कलम 145(b) आणि 147 अंतर्गत आरोप ठेवण्यात येऊन अटक करण्यात आली.

ही जलद कृती अतिक्रमण आणि अनधिकृत प्रवेशाबाबत मध्य रेल्वेचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण प्रदर्शित करते आणि गुन्हेगारांना कडक चेतावणी देते.

अलीकडेच अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, ज्यात उत्तर रेल्वेच्या गुलजार शेखच्या प्रकरणाचा समावेश आहे, ज्यांना रेल्वे सुरक्षा दलाने व्हिडिओ बनवण्यासाठी रेल्वे रुळांशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली होती.

मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते आणि प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणणारी, रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणारी आणि रेल्वे कायदे आणि नियमांचे उल्लंघन करणारी अशी कृत्ये करू नयेत असे आवाहन सर्व लोकांना करते. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

यापुढे सर्व नागरिक आणि प्रवाशांना रेल्वे विनंती करीत आहे की, रेल्वेच्या आवारात कोणीही असे कृत्य करत असल्यास 9004410735 किंवा 139 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि प्रवासी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत.