रावेर – ट्रॅक्टरच्या बॅटर्या चोरीचा गुन्हा उघड करण्यात रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. दोन चोरट्यांना गजाआड करण्यात आले .

दोघां चोराकडून रावेर पोलिसांनी एकूण 13 हजारांच्या ट्रॅक्टरच्या बॅटर्या जप्त केल्या आहेत. 26 जुलैच्या रात्री रावेर शहरातील ट्रॅक्टर चालक इकबाल खान गुलशर खान (मदिना कॉलनी) यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी रावेर शहरातील डीएम हॉलमागील उर्दू शाळेजवळुन लांबवली होती.याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रावेर पोलिसांकडून गुन्ह्याची उकल सुरू असताना संशयीत आरोपी मुस्तकीम खान मन्नान खान (20, नागझिरी रसलपुर रोड, रावेर) व अमीर खान युनूस खान (23, रसलपूर ग्रामपंचायतीसमोर, रावेर) यांना अटक करण्यात आली. आरोपींना बोलते केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून साडेचार हजार रुपये किंमतीची ग्लोबल कंपनीची व साडेचार हजार रुपये किंमतीची श्रीनिवास कंपनीची तसेच चार हजार रुपये किंमतीची एक जैनको कंपनीची लाल रंगाची बॅटरी जप्त करण्यात आली.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहा.अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील हवालदार रवींद्र वंजारी, कॉन्स्टेबल सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, विकार शेख, अमोल जाधव, महेश मोगरे यांच्या पथकाने केली.


