बाप अन्‌ लेक एकाच दिवशी झाले पीएसआय !पानपाटलांची अशीही ‘पाटीलकी’ : धुळेकरांना आनंदाचे भरते

धुळे,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत येथील रोहन पानपाटील त्यांच्या संवर्गातून 35व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. दि. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी तो आनंद साजरा करत असतानाच रोहनचे वडील तथा सहाय्यक उपनिरीक्षक गुरुदत्त पानपाटील यांनी 2013 मध्ये खातेअंतर्गत दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन त्यांचीही पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याची वार्ता आली अन्‌ पानपाटील यांच्या घरी आनंदाचे डोही आनंद तरंग असे वातावरण निर्माण झाले. पानपाटील कुटुंबासाठी हा आनंदाचा असला तरी गावकऱ्यांनी देखील त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी केली होती.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या रोहनचे प्राथमिक शिक्षण पिंपळनेर ता. साक्री येथील आ. मा. पाटील विद्यालय, तर माध्यमिक शिक्षण साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशनची पदवी मिळवली. बालपणापासूनच वडिलांच्या खाकी वर्दीचे त्याला विशेष आकर्षण होते. स्पर्धा परीक्षांकडे त्याचा कल असल्याचे पाहून वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले अन्‌ त्यामुळे तो या परीक्षेच्या तयारीला लागला. येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आमदार अमरिश पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रीमती केतकीबेन पटेल सेंट्रल लायब्ररीमध्ये रोहनने नियमित स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी साकारलेल्या किसान विद्याप्रसारक संस्थेच्या (कै.) विश्वासराव रंधे क्रीडासंकुलाच्या क्रीडांगणावर त्याने शारीरिक चाचण्यांचा कठोर सराव केला. पिता-पुत्राला एकाच दिवशी पोलिस उपनिरीक्षकपदाची संधी मिळाल्याबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी भागवत सोनवणे यांनी कौतुक केले. हा दुग्धशर्करा योग असल्याची प्रतिक्रिया श्री. धिवरे यांनी व्यक्त केली.

एका तपाची प्रतीक्षा संपली

रोहनचे वडील गुरुदत्त पानपाटील 1991 मध्ये पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी 33 वर्ष सेवा बजावली आहे. 2013 मध्ये त्यांनी पोलिस खात्यांतर्गत ‘एमपीएससी’तर्फे घेण्यात आलेली पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र तब्बल 11 वर्षांनी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. ते सध्या येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाचक शाखेत सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. एका तपाचे फळ त्यांना मिळाले आहे.

‘‘आजवर घेतलेल्या परिश्रमांचे चीज झाले. मुलास अधिकारी होण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिले. त्याने माझा विश्वास सार्थ ठरवला. मी पदावर, तर मुलगा प्रशिक्षणासाठी रवाना होत असल्याचा योगही जुळून आला. या यशात पत्नी ममता हिचा खूप मोठा वाटा आहे. वरिष्ठांकडून येथील संस्थांकडून नेहमीच साथ आणि सहकार्य लाभले. मुलाने आदर्श अधिकारी व्हावे हीच अपेक्षा आहे.

– गुरुदत्त पाटील, रोहनचे वडील.