भुसावळ : भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनीतील वयोवृद्धाचे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा मिळून दोन लाख 69 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. घरफोडीची घटना रविवार, 28 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता समोर आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
रामप्रसाद गोपाल चंदन (66, रा. गुंजाळ कॉलनी, भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शनिवार, 27 जुलै रोजी रात्री 10 ते रविवार, 28 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान चंदन परिवार बाहेरगावी असल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या कंपाउंड गेटचे आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने व रोकड मिळून एकूण दोन लाख 69 हजारांचा ऐवज लांबवला. घरफोडीचा प्रकार रविवारी सकाळी 9.30 वाजता समोर आला. रामप्रसाद चंदन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.
हा ऐवज लांबवला
चोरट्यांनी 28 हजार रुपये किंमतीचे पोतचे चार ग्रॅमचे पॅण्डल, 42 हजार रुपये किंमतीची सहा ग्रॅमचे कानातील झुमके, 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 35 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅमची अंगठी, 28 हजार रुपये किंमतीचे चार ग्रॅमचे मंगळसूत्र, 18 हजार रुपये किंमतीचे कानातील लटकन, 15 हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स, 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, 42 हजार रुपये किंमतीची सोन्याची सहा ग्रॅमची पोत व 14 हजार रुपये किंमतीचे चार ग्रॅमची पोत व आठ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी भेट दिली.


