शिक्षकी पेशातच मिळतो खरा आनंद – डॉ. दीपक पाटील यांचे प्रतिपादन : म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांचा सेवामूर्ती सन्मानपत्र देऊन गौरव

भुसावळ – उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नोकरी केली जाते. प्रत्येक क्षेत्रात काम केल्यानंतर त्याचे वेतन मिळते. मात्र शिक्षकी पेशात वेतनासोबतच लहान मुलांमध्ये रमण्याचा व त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा आनंद मिळत असतो. समाजात शिक्षकांप्रती असलेली आदराची भावना व मिळत असलेला सन्मान यामुळे शिक्षकी पेशातच खरा आनंद असल्याचे प्रतिपादन आळंदी देवाची येथील श्रीसंत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांनी केले.

भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी म्युनिसिपल हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून निळकंठ फिरके, हेमंत अलोने, आर.सी. गोसावी, सौ. संगीता फिरके व सत्कारार्थी म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके उपस्थित होते. प्रारंभी नाना पाटील यांनी परिचय करून दिला. त्यानंतर म्युनिसिपल हायस्कूल व द.शि. विद्यालयातर्फे श्री. फिरके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, शिक्षणक्षेत्रासह इतर क्षेत्रात कार्यरत राहून फिरके सरांनी आनंददायी शैक्षणिक कारकीर्दीतून स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून नाविन्यपूर्ण कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. प्रा. आर.वाय. पाटील यांनी लहानपणापासूनची मैत्री व शिक्षण याविषयी सांगून त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा घेतला. संजयसिंग चव्हाण यांनी त्यांच्या परखड व भावनिक स्वभावाविषयी सांगितले. अवधूत दामोदरे यांनी त्यांचा वाचन अनुभव सांगितला. सुनील भिरूड यांनी शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कथन केले. जयंत चौधरी यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. नरेंद्र राठोड यांनी शाळेचे अनुभव सांगितले. सीमा भारंबे यांनी कविता सादर केली. सुभाष मेढे यांनी सहकारी शिक्षक म्हणून अनुभव सांगितले. आर.सी. गोसावी यांनी त्यांच्या कार्याची शैली सांगितली. अध्यक्षीय मनोगतात सरला सावकारे यांनी फिरके सरांच्या मुख्याध्यापक कालखंडातील उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. त्यानंतर डॉ. जगदीश पाटील यांच्यातर्फे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांना सेवापूर्ती सेवामूर्ती सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी केले. सत्कारार्थी मनोगतातून श्री. फिरके यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे यांनी केले तर आभार रेखा सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्वच स्तरातील स्नेहीजणांची उपस्थिती होती.

फोटो ओळी – मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांना सेवामूर्ती सन्मानपत्र प्रदान करताना डॉ. जगदीश पाटील पाटील सोबत हेमंत अलोने, जयंत चौधरी, नितीन झांबरे, सरला सावकारे, निळकंठ फिरके, आर.सी. गोसावी, सौ. संगीता फिरके आदी.