चाळीसगाव : दिराशी असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधात पती अडसर ठरू लागल्याने पत्नीने दिरासोबत प्लॅन करीत पतीचा खून केला मात्र चाळीसगाव शहर पोलीस व गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत दोघांना बेड्या ठोकल्या. बाळू सीताराम पवार (35, रा.गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता. नादंगाव, जि. नाशिक) असे या मयताचे नाव असून बुधवारी कोदगाव येथे त्याचा मृतदेह आढळला होता.
राष्ट्रीय महामार्ग 52 वर कोदगाव शिवारात मंगळवारी रात्री 11 वाजेच्या पूर्वी ऊसतोड कामगार बाळू सिताराम पवार याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगडही मिळाला तर बाळू पवार याच्या शरीरावर ब्लेड व दगडाने मारल्याचा खूणा आढळून आल्या होत्या त्यामुळे दगड व ब्लेडने गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट होते. मयत बाळू पवार हे पत्नी वंदना पवार (30) हिच्यासह न्यायडोंगरी येथे राहत होते. वंदना हिस बाळू हा दारु पिवून शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यामुळे ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती.
वंदना पवार हिचे चुलत दिर गजानन राजेंद्र पवार (32, रा.न्यायडोंगरी ता. नांदगांव जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातील पती बाळूचा अडथळा दूर करण्यासाठी वंदना हिने गजानन याच्यासोबत पतीला मारण्याचा कट रचला होता. त्याप्रमाणे वंदना व बाळू हे मंगळवार, 18 रोजी चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारु पाजली. सायंकाळी वंदना हिने आपणास माहेरी कन्नड येथे जायचे आहे, असे सांगत बाळू यास गजानन याच्या दुचाकीवर कोदगाव शिवारात नेले. वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले.
दोघांनी संशय येवू नये म्हणून मृतदेह ओढत नेऊन महामार्गावर टाकून दिला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले. दरम्यान, तुषार अनिल देसले (रा.कोदगाव, ता.चाळीसगाव) यांनी 18 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलिसात अपघाताची माहिती दिली. त्यावरुन चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एपीआय सागर ढिकले यांनी फिर्याद दिली. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता
बाळू पवार याच्या अंगावरील खुणांमुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यावरुन मयताच्या नातेवाईकांकडे विचारपूस करण्यात आली. वंदना हिच्याकडे फोनवरुन चौकशी केली असता संशय आणखी वाढला. चाळीसगाव रेल्वेस्थानक परिसरातून बुधवारी सायंकाळी वंदन व गजानन यांना ताब्यात घेण्यात आले. तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाची झाडाझडती घेतली असता पोलिसांना मृत इसमाच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळाला. त्या आधारे पोलिसांनी मृताच्या पत्नीला फोन करून तू कुठे आहे असे विचारले, त्यानंतर त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, मी सध्या शिर्डीला आहे आणि माझा पती न्यायडोंगरीला गेला आहे परंतु पोलिसांना महिलेच्या बोलण्यावर संशय आला. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने ात्काळ महिलेचा फोन ट्रेस केला असता सदर महिलेचे लोकेशन चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशन जवळ असल्याचे स्पष्ट झाले. लोकेशन नुसार एलसीबीसह स्थानिक पोलिसांच्या पथकाने रेल्वे स्टेशनला शोध घेतला असता महिला तेथे आढळल्यानंतर तिला अटक करण्यात आली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीसह चाळीसगाव पोलिसांचे पथक यशस्वी झाले.



