नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी नागपूर-अमरावती मार्ग रोखून धरला होता. हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना स्फोटावेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच कामाला होत्या, अशी माहिती समोर आली आहे. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
फटाकावातीचे रील्स बनवताना मशीनमध्ये अति उष्णता झाल्याने हा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. जखमींपैकी एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तोदेखील 99 टक्के भाजला आहे, अशी माहिती डॉ. पिनाक दंदे यांनी दिली.



