बियाणी यांच्या त्या जमीन बोजा प्रकरणी नोंद नामंजूर
भुसावळ प्रतिनिधी -तालुक्यातील कुर्हे येथील गट क्र. 202 व 202/1 यावरील फेरफार क्रमांक 13323 व 13324 नोंदी संदर्भात नमुना 9 वरील बोजाच्या रकमेवर तलाठी विशाखा खटेश्वर मुन व कुर्हे पानाचे येथील तत्कालीन मंडळ अधिकारी सतीश मधुकर इंगळे यांनी व्हाईटनर लावून सदर शासकिय दस्तऐवजामध्ये छेडछाड केली आहे. अशी तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.25-7-2023 रोजी तक्रार दाखल केली होती.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना चौकशी आदेश दिले होते. याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी सदरील कागदपत्रांची तपासणी केली असता गट नं. 202/1 व 203 च्या इतर अधिकारात महेश मर्चंट को.ऑप. सोसायटी लि. भुसावळ यांचा जप्ती बोजा अनुक्रमे 8 कोटी 22 लाख 14 हजार 895 व 7 कोटी 82 लाख 90 हजार 463 रूपये अधिक व्याज, अधिक सरचार्ज होणार मिळकतीवरील जप्ती बोजा उठविण्यात येत आहे, असे नमुद केले आहे. यामध्ये व्याज, सरचार्ज होणारा खर्च याबाबींचा उल्लेख नाही. परंतु आदेश हा जप्ती उठविण्याचा असल्याने तलाठी यांनी सदरील नोंदी यांनी जप्ती बोजा कमी केलेला आहे. याबाबत पूर्ण चौकशी करून वादी केदारनाथ वामन सानप व प्रतिवादी मंडळ अधिकारी, तलाठी, महेश मर्चंट को.ऑप. सोसायटी भुसावळ, विनोद बन्सीलाल बियाणी, कांताबाई बन्सीलाल बियाणी यांची सुनावणी झाली. सदरील चौकशी मध्ये उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अर्जदार यांचा रिव्हीजन अर्ज अंशताः मंजूर करण्यात येत आहे व मौजे कुर्हे प्र.न. येथील 13323 व 13324 सदरील नोंद नामंजूर करण्यात येत आहे, असे आदेश क्र.आरटीएस/रिव्हीजन/135/2023 प्रमाणे दि.29-5-2024 रोजी दिले.
या प्रकरणी वादी केदारनाथ सानप यांनी स्वतः युक्तीवाद केला. तर महेश मर्चंट यांच्यातर्फे अॅड. दिपक पाटील व बियाणी यांच्यातर्फे अॅड.कल्याण पाटील यांनी कामकाज पाहिले.




