इंदौरला उच्च पदावर जॉब मिळालेल्या तरुणाचा अकस्मात मृत्यू :

जळगाव : नाशिक येथील कागदपत्रे घेवून सकाळी तरुण घरी आला. शौचालयात गेल्यानंतर कोसळून त्याचा मृत्यू झाला. गुरुवार, 4 रोजी ही घटना शहरातील विठोबानगर, जुनेखेडी रोड येथे घडली. गिरीष देविदास चौधरी ( वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. हदयविकाराच्या झटक्याने किंवा उष्म्याने तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

मृत्यू कारण अस्पष्ट
नातेवाईकांच्या माहितीनुसार, गिरीष चौधरी हे अविवाहित होते. ते नाशिक येथे एका कंपनीत कार्यरत होते. विठोबानगरात आई वडिलांसह ते वास्तव्यास होते. त्यांना इंदोर येथे उच्च पदावर नुकताच जॉब लागला होता. त्यासाठी ते कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी नाशिक येथे गेले होते. ते काम आटोपून ते आज सकाळी जळगाव येथे राहत्या घरी आले. ते शौचास गेल्यानंतर ते कोसळल्याचा आवाज आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी धावपळ करत आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

कुटुंबातील सदस्यांच्या आवाजाने शेजारील नागरिकांनी धाव घेतली. शौचालयाचा दरवाजा तोडून पाहिले असता ते बेशुध्दावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना दुपारी 12.55 वाजता मृत घोषीत केले. ही वार्ता कानावर पडल्यानंतर आई वडिलांसह नातेवाईकांना जबर धक्का बसला.

गिरीष चौधरी हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई वडिल भाऊ असा परिवार आहे. एएसआय परिश जाधव यांनी रुग्णालयात पंचनामा केला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.