नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीने डोके वर काढले असतानाच सातपुरच्या कामगार नगरामधील गुलमोहर कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये हॉटेल ‘कूक’चा अज्ञातांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून खून केल्याने खळबळ उडाली आहे. खुनाचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आली. महेंद्र प्रकाश सार्की (22, रा.कौशल्या व्हिला, गुलमोहर कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मध्यरात्री झाला घातपात
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगार नगरातील गुलमोहर कॉलनीतील कौशल्या व्हिला नावाची अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर महेंद्र हादेखील वास्तव्यास होता. रात्रीच्या सुमारास तो मोबाइलवरून कुणाशीतरी बोलत गच्चीवर गेला आणि तेथेच त्याच्यासोबत घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.
खुनाची माहिती मिळताच सातपूर पोलिसांसह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ.सीताराम कोल्हे, शेखर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत.


