अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा खून : भडगाव तालुक्यातील घटना ; पत्नीला अटक –

भडगाव : अनैतिक संबंधात पती नेहमीच अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढल्याचा संतापजनक प्रकार भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे घडला. पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत याप्रकरणी प्रियकरासह पत्नीविरोधात भडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर शिवाजी पाटील (45, रा.पाळासखेडे, ता.भडगाव) असे मयताचे नाव आहे.

संबंधात अडसर : प्रियकराच्या मदतीने केला खून
भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील पत्नी पुष्पा पाटीलसोबत वास्तव्याला होते. किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज (आळंदी, जि.पुणे) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा आराप आहे. या संबंधाच्या कारणातून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते. संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने पुढाकार घेत प्रियकराला बोलावत नियोजन केले. प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले. त्यानुसार किशोर पाटील हा शनिवार, 30 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता घरातून बाहेर पडला. रस्त्यावर दबा धरून बसलेले राजेंद्र शेळके यांनी अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला ठार केले. हा प्रकार रविवार, 31 मार्च रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आला.

पोलिसांकडून खुनाची उकल
खुनाची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी पत्नी पुष्पा पाटील हिला ताब्यात घेतले. खून प्रकरणी शिवाजी परसराव पाटील यांच्या फिर्यादीवरून पुष्पा किशोर पाटील (पळासखेडे) व राजेंद्र शेळके महाराज (आळंदी) यांच्याविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.अधीक्षक अभयसिंह देशमुख करीत आहेत.