भुसावळ : भुसावळातील पोलिसांनी अवैधरीत्या 72 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 910 ग्रॅम मेथाक्वॉलोन विक्रीपूर्वीच जप्त करीत भुसावळातील त्रिकूटासह मुंबईतील संशयीताला अटक केली होती. संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर कोठडीची मुदत संपताच पुन्हा रविवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयीत आठ हजार रुपयात एक ग्रॅम अंमली पदार्थ विक्री करीत असल्याने चारही संशयीतांनी पैसा काय केला ? तसेच मुंबईत अजून कोणी साथीदार आहे का, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस कोठडीत असतांना पोलिस संशयीतांकडून अनेक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत चार आरोपींना अटक
हॉटेल मधूबनमध्ये संशयित ड्रग्ज विक्रीसाठी आल्यावर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून मंगळवार, 19 मार्च रोजी रात्री ड्रग्ज विक्री करतांना दोन संशयीतांना पकडले होते तर तिसर्याला घरातून अटक करण्यात आली. संशयितांनी ड्रग्ज मृदूल वैद्य या संशयिताकडून मुंबईहून आणल्याची कबुली दिल्यानंतर त्यासदेखील अटक करण्यात आली. कुणाल भरत तिवारी, जोसेफ जॉन वालाड्यारेस या संशयितांकडून 72 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 910 ग्रॅम मेथाक्वॉलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. संशयितांनी हे ड्रग्ज दीपेश मुकेश मालवीय (रा. लाल जैन मंदिरामागे, भुसावळ) याने दिल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली व या संशयीताने मुंबईतून वैद्य कडून ड्रग्ज आणल्याचे सांगताच त्यासही अटक करण्यात आली. वैद्य याने मुंबईतून येथून एकाकडून अंमली पदार्थ आणल्याची कबुली दिल्याने आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. भुसावळ येथील संशयीतांनी विक्री केलेल्या अंमली पदार्थातून मिळालेल्या रक्कमेचे त्यांनी काय केले, ऑनलाईन कुणा-कुणाला रक्कम पाठवण्यात आली ? याचा तपास आरोपींना मिळालेल्या पोलीस कोठडीत केला जाणार आहे. तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पघडन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


