रेल्वेच्या सेवानिवृत्त ट्रॅकमनकडे आढळली कोट्यावधीची संपत्ती –

पिंपरी : रेल्वेतून अलीकडेच सेवानिवृत्त झालेल्या ट्रॅकमनकडे कोट्यवधीची संपत्ती आढळली आहे. उत्पन्नापेक्षा जास्तीची संपत्ती असल्याने ट्रॅकमॅनच्या विरोधात पुण्यातील केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) पथकाने गुन्हा दाखल केला आहे. मल्लीनाथ भीमाशंकर नोल्ला (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल असलेल्या संशयिताचे नाव आहे.

वर्षभरापूर्वीच सेवानिवृत्त
मल्लीनाथ हा रेल्वेच्या अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) विभागात ट्रॅक मेंटेनर होता. खडकी स्टेशन येथे कार्यरत असताना ऑगस्ट 2023 मध्ये तो सेवानिवृत्त झाला. लोकसेवक असताना मल्लीनाथ याने एप्रिल 2008 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:च्या तसेच कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त प्रमाणात असल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले. मल्लीनाथ याने मिळवलेल्या संपत्तीपैकी दोन कोटींपेक्षा जास्त किमतीची संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे समोर आले.

सहा फ्लॅट, सात मिळकती, सहा दुचाकी, एक चारचाकी
मल्लीनाथ याने 2008 ते 2023 या कालावधीत सर्वाधिक संपत्ती जमा केली. यात सहा फ्लॅट, सहा दुचाकी व एक चारचाकी अशी सात वाहने देखील खरेदी केली. त्याचप्रमाणे मोकळे प्लॉट, जमीन, इमारत अशा काही मिळकतीही खरेदी केल्या. त्याचे वेतन आणि संपत्तीचे व्यवहार यात मोठी तफावत आहे. तसेच त्याने पगारातील मोठी रक्कम बचत केली असल्याचेही समोर आले.