जीवनाचे धेय्य गाठतांना चारीत्र्यवानही बना : भुसावळात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण –

भुसावळ : विद्यार्थिनींनी आपले करीयर करीत असतांना चारीत्र्य सुद्धा जपले पाहिजे. मोबाईल, चुकीची संगत, बडेजावपणाची हाव यामुळे मुली भरकटतात आणि क्षणिक मोहाला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेतात. यासाठी मुलींनी जागरूक राहून मोबाईलचा वापर केला पाहिजे. ,अनोळखी कॉल किंवा रीक्वेस्टला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी येथे केले. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व प.क.कोटेचा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच युवती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक जागरूकता या विषयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
कॉन्स्टेबल विजया सपकाळे यांनी कॉलेज युवतींना वाहतुकीचे नियम आणि घ्यावयाची खबरदारी याबद्दल मार्गदर्शन केले. प्रसंगी इनरव्हील क्लबतर्फे वाहतूक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण व कॉन्स्टेबल विजया सपकाळे यांचा गौरव करण्यात आला. पाहुण्यांचा परीचय इनरव्हील अध्यक्षा रेवती मांडे यांनी तर आभार प्रा.डॉ.शरद अग्रवाल यांनी मानले. प्रसंगी सचिव सीमा सोनार, विनीता नेवे, स्मिता चौधरी, अंजली जोशी, डॉ.किर्ती चांदवडकर आणि शीतल पांढरकर या सदस्या उपस्थित होत्या.

यशस्वीतेसाठी महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापक तळेगावकर व सहकार्‍यांनी परीश्रम घेतले.