भुसावळ : जागेवरील वादातून हाणामारीनंतरही दोषींवर कारवाई नाही, नवर्याशी बायकोचे भांडण , सुनेकडून सासर्याचा होणारा छळ, सासरच्या मंडळींकडून होणारा सुनेचा छळ, क्षुल्लक वादातून शेजार्यांशी भांडण, हजसाठी पैसे भरले मात्र फसवणूक झाली अशा एक ना अनेक तक्रारींचे जवळपास २७६ अर्ज बाजारपेठ पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दाखल झाले मात्र त्यांचा निपटारा होत नव्हता. नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पदभार घेताच प्रलंबित कामांचा आढावा घेतानाच बाजारपेठ ठाण्यातील प्रलंबित अर्जांच्या निर्गतीसाठी शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले. बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल करणार्या सर्वच तक्रारदारांसह संबंधितांना बोलावले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आल्यानंतर यावेळी १८० अर्ज निकाली काढण्यात आले. पोलिसांच्या कौटूंबिक वादात समेट घडला तर कायदेशीर कारवाईच्या इशार्याने शेजार्यांमधील मनभेद दूर होवून चांगले वागण्याची ग्वाही मिळाली. वर्षानुवर्षे अडगळीत पडलेल्या अर्जावर निपटारा झाल्यानंतर तक्रारदार अर्जदार भारावले व त्यांनी पोलीस प्रशासनाला मनापासून धन्यवाद दिले.
फसवणूक, अवैध सावकारी, शेजारच्यांकडून होणारा त्रास, पती-पत्नीतील कौटुंबिक वाद यासह विविध नाजूक विषयांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यात आले मात्र वेळीच अर्ज निकाली न निघाल्याने तक्रारदार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत होते. भुसावळची धूरा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी हाती घेतल्यानंतर सर्वात आधी प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर दिला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. मूळ तक्रारदार, ज्याच्याविरूध्द अर्ज आहे तो संबंधित व तपासी अंमलदार यांना समोर उभे करून बाजू समजून घेण्यात आली. तब्बल 280 तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन करण्यात यंत्रणेला यश आले तर शेजार्यांमधील मनमिटाव दूर झाला तर कौटूंबिक वादातील प्रकरणात कायद्यातील तरतुदी समजून सांगितल्यानंतर दाम्पत्यांनीही सामंज्यस्याची भूमिका घेत एक-एक पाऊल मागे घेत घडल्या प्रकारावर पडदा टाकत चांगले वागण्याची हमी दिली. फसवणुकीच्या प्रकरणात अर्जदाराची तक्रार योग्य ठरल्याने थेट संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना डीवायएसपी पिंगळे यांनी दिल्या. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर अर्जदारांची गर्दी झाली सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत कामकाज चालले. बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रथमच अर्ज निकाली निघण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

तक्रारदाराचे समाधान झाल्यास आम्हालाही आनंद : पोलीस उपअधीक्षक
पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे म्हणाले की, तक्रारदार यांचे समाधान करण्याकडे आम्हा पोलिसांचा कल राहतो. त्यांच्या शंकांचे समाधान झाल्यास त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहिल्यावर आम्हा पोलिसांनाही आनंद वाटतो. समस्या निकाली निघाल्यावर तसे लेखी लिहून घेण्यात आले आहे आहे. यापुढे प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जावून तक्रारींचा निपटारा केला जाईल, असेही पिंगळे म्हणाले.
वरीष्ठांच्या मार्गदर्शनाने तक्रारी निकाली : पोलीस निरीक्षक गायकवाड
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित त क्रार निवारण दिनात 180 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. यापुढे वेळेवर अर्जांची निर्गती करण्यावर भर असेल शिवाय दर महिन्याला तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून तक्रारदारांना न्याय दिला जाईल, असे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले.


