भुसावळ – खारदुंगलासारख्या जगातील सर्वोच्च ठिकाणच्या रस्त्यावर हाडे गोठवणारी थंडी, ऊन , पाऊस व बर्फवारी या नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत १3300 फूट उंचीवरील खारदुंग गावातून धावत सुरुवात करायची. १८ हजार ३०० फुटांपर्यंतचा सुमारे ३२ किमीचा चढाव आणि पुढे सुमारे तेवढाच पण ४० किमीचा उतार. एकूण ७२ किमीचा हा रस्ता एखादा धावपटू पूर्ण करत असेल तर त्या व्यक्तीला ‘महामानव’ असेच संबोधले गेले पाहिजे. हा पराक्रम केलाय भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रा प्रवीण फालक व जळगाव रनर्स ग्रुपचे गुरुप्रसाद तोतला यांनी. प्रवीण फालक यांनी १२ तास ३३ मिनिटात तर गुरुप्रसाद यांनी १३ तास १३ मिनिटात हे अवघड आव्हान पूर्ण केले . त्यांच्याशिवाय जळगाव रनर्स ग्रुपचे धावपटू सौरव अडवाणी यांनी 2 तास 41 मिनिटात, भाविक जैन यांनी 2 तास 35 मिनिटात व स्वरूप चंदनकर यांनी 2 तास 40 मिनिटात 21 किलोमीटर गटात यशस्वी सहभाग नोंदविला. ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 50% व अतिशय प्रतिकूल वातावरण यात देखील या तीनही धावपटूंनी अतिशय कमी वेळात 21 किलोमीटरचे अंतर यशस्वी पूर्ण केले याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
भारतातील अत्यंत दुर्गम अशा लडाख जिल्ह्यातील तरुणांना/महिलांना मॅरेथॉनसारख्या साहसी खेळाची ओळख व्हावी, त्यांच्यातील नैसर्गिक गुणांना योग्य वाव मिळावा म्हणून श्री. चेवांग मोटूप गोबा यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे हे सहावे वर्ष. ७२ किमीचे खारदुंगला चॅलेंज, ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन, २१ किमीचा अर्ध मॅरेथॉन किंवा ७ किमीची शाळकरी मुलांसाठीची फन रन यापैकी कोणत्याही विभागामध्ये भाग घेणाऱ्या धावपटूला आपल्या स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याचा कस लावून ठरलेले लक्ष्य गाठताना आनंद गगनात मावेनासा न झाला तरच नवल. कारण इतर कोणत्याही शहरातील मॅरेथॉन धावणे आणि लेह येथील मॅरेथॉन धावणे यातील प्रमुख फरक म्हणजे तेथील ऑक्सिजनची कमतरता आणि लहरी हवामान. मुळात ऑक्सिजन कमी अर्थात केवळ 50 टक्के असताना , त्यानुसार जुळवून घेत जास्तीत जास्त वेगाने धावत स्पर्धा पूर्ण करणे हे खरोखर आव्हानात्मक आहे.
तेथील स्थानिकांना हा त्रास अर्थातच कमी होतो. परंतु जळगाव जिल्ह्यासारख्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशातून तेथे पोहोचलेल्या धावपटूंना ह्यासाठी नक्कीच विशेष प्रयत्न करावे लागतात. हे थोडेसे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. सर्वप्रथम तेथील निसर्गाचा आपल्या मनात योग्य तो आदर असणे अत्यावश्यक आहे. तसेच तेथे न टाळण्याजोगे विरळ वातावरण असले तरी त्या परिस्थितीशी आपण जुळवून घेऊ शकतो असा आत्मविश्वास आपल्यात असणे जरूरीचे आहे. त्यासाठी लेहमध्ये किमान ८-१० दिवस अगोदर पोहोचणे, सतत थोडे थोडे पाणी/द्रवपदार्थ पित राहणे हे अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे तेथील शुष्क वातावरणात शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि हलकेसे डोके दुखणे, दमछाक होणे या व्यतिरिक्त इतर काही तक्रारी उद्भवत नाहीत. विरळ वातावरणाशी जुळवून घेण्यास शरीरास वेळ लागतो व तेवढा वेळ देणे आवश्यक आहे असे श्री प्रवीण फालक यांनी सांगितले.
थोडासा आराम, थोडे स्थानिक स्थळदर्शन असे फिरत वातावरणाचा अंदाज घेतला. सुमारे ५०० फूट चढण असलेला लेह पॅलेस पाहताना थोडीशी दमछाक झाली मात्र ते आवश्यक होते. तसेच पायांस सराव असावा म्हणून सुमारे ४ ते ५ किमी धावणे/चालणे हाही व्यायाम करून थोडे शरीरास चालते ठेवले. सभोवताली उंचच उंच डोंगर, त्यांचे सूर्याच्या कोनानुसार दिसणारे रंगबदल, बोचरी थंडी, भुरभुरणारा पाऊस, स्नो-फॉल, तर कधी स्वच्छ निळे आकाश यांच्या सान्निध्यात दररोज सुमारे ८-१० किमीची चढ वा उताराची चाल. ह्या निसर्गभ्रमणात सुमारे १६००० फुटांवरील ‘शँग-ला’ ही खिंडही आम्ही पार केली ज्यामुळे लेहपेक्षाही अधिक विरळ हवामानात काही काळ व्यतीत केल्याचा फायदा आम्हाला पुढे मिळणार होता. १ आठवडा आधी येऊन तेथील वातावरणात शारीरिक कष्टाचा सराव तर झालाच पण उल्हसित मने पुढील मॅरेथॉनचे मानसिक आव्हान पेलण्यासही समर्थ झाली असे प्रतिपादन गुरुप्रसाद यांनी केले.
या अल्ट्रामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अधिकाधिक वेळ व अधिकाधिक अंतर धावण्याचा सराव व्हावा म्हणून नाशिक जवळील ब्रह्मगिरी पर्वतावर 46 किलोमीटर 6 तास 45 मिनिटात धावण्याचा देखील सराव या दोन्ही धावपटूंनी 31 जुलै 2022 रोजी केला होता. शिवाय सातपुड्याच्या कुशीत असलेल्या पालच्या घाटात खुपदा आम्ही केलेला सराव फळास आला असेही 72 किमीमध्ये यशस्वी झालेले धावपटू म्हणाले.
उत्कृष्ट आयोजनासाठी देखील हि मॅरेथॉन संस्परनिय ठरलीय कारण वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, दर सुमारे ३ किमीनंतर पाण्याचे ठिकाण, इतर पोषक पेये, केळी, इत्यादींची व्यवस्था चोख होती. वाटेतील गावकरी, शाळकरी मुले, सैन्यदलाचे जवान इ. अनेक व्यक्ती आनंदाने टाळ्या वाजवत धावपटूंचा उत्साह वाढवत होते, त्यांना काही हवे/नको ते पाहत होते.

आयोजकांचेही सर्व धावपटूंवर लक्ष्य होते व आव श्यक ती वैद्यकीय मदतही पुरवली जात होती. याशिवाय स्थानिक पोलीस प्रशासन व सैन्य दलाचे जवान देखील धावपटूंना विशेष प्रोत्साहित करीत होते व त्यांनी कायदा व सुव्यवस्था अतिशय चोखपणे बजावली असे सर्व धावपटूंनी सांगितले.
यशस्वी सर्व धावपटूंचे भुसावळ स्पर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे डॉ तुषार पाटील व जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव, डॉ. सोनाली महाजन, डॉ राहुल महाजन व सर्व धावपटूनतर्फे अभिनंदन करण्यात आले.


