भुसावळात लाडक्या बाप्पाला उत्साहात व आनंदात भावपूर्ण निरोप;


भुसावळ – दोन वर्षांच्या कोरोना सावटानंतर सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. दहा दिवसाच्या आराधनेनंतर 9 रोजी शहरातील विविध मंडळे व घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. यासाठी शहरातील मिरवणूक मार्गासह विविध रस्ते, तापी नदीपात्राजवळ पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर विसर्जनासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाययोना करण्यात आल्या होता.
विसर्जन मिरवणूकीत दुपारी साधारण 2.30 वाजता पहिले मंडळ पार झाले. त्यानंतर रात्री 11.30 वाजेपर्यंत मिरणूक मार्गावरुन तब्बल 29 मंडळे पार झाली.
शहरात गणेश मुर्त्यांच्या विसर्जनासाठी विविध छोट्या -मोठ्या मंडळांची सकाळपासूनच धामधुम सुरु होती. मिरवणूक रांगेतली 41 पैकी केवळ 29 मंडळांनी मिरवणूकीत सहभाग घेतला. दुपारी साधारण 2 वाजता येथील जय गणेश फाउंडेशनची गणेश मुर्ती मिरवणूक मार्गात पहिल्या क्रमांकाने दाखल झाली साधारण 2.30 वाजता मंडळ लक्ष्मी चौकात दाखल झाले. त्या ठिकाणी बाजापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड याच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पालिकेचे उपमुख्याधिकारी श्री. ढाके, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अध्यक्ष चैत्राम पवार,समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, पालिका व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
लक्ष्मी चौकातून मिरवणूक रांगेतील शेवटचे मंडळ रात्री 11.30 वाजता रवाना झाले. त्यानंतर सर्वच मंडळांकडून वाजंत्री बंद करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत तापी नदीसह हतनुर धरण, वाघुर धरण, पूर्णा नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. तर काही मंडळांनी रात्री विसर्जन न करता शनिवारी
ठिकठिकाणी मूर्त्यांचे विसर्जन केले. दरम्यान, मिरवणूक रांगेतील पहिल्या मंडळाच्या मूर्तीचे सायंकाळी 7.30 वाजता येथील तापी नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. नदी पात्रात पालिकेच्या वतीने विशेष योजना करण्यात आली होती. नदी पात्रात जाणार्‍या रस्त्यांवर लाकडी बॅरिकेट लावण्यात आले होते. त्या ठिकाणी पोलिस व पालिका प्रशासनाच्यावतीने स्वयंसेवकांनी मूर्त्या स्विकारुन नदी पात्रात विसर्जन केले. तत्पूर्वी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी नदी पात्राची पहाणी केली. विसर्जनासाठी पालिकेच्या वतीेने नदी पात्राच्या परिसरात उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या सह शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. गजानन पडधन यांच्या मार्गदर्श कर्मचारी विशेष लक्ष ठेवून होते.
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व पालिका प्रशासनाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. यंदा पहिल्यांदाच लक्ष्मी चौकात यत्किंचित सुद्धा गुलालाची उधळन झाली नाही मशिद चौकात मंडळांकडून गुलाल उधळू नये म्हणून पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले होते.
अप्पर पोलिस अधिक्षका चंद्रकांत गवळीसह डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोनि राहुल गायकवाड,यांच्या कणखर नेतृत्वात गणेश मंडळ यांनी सुद्धा गुलाल न उधळून पोलिस प्रशासनास सहकार्य केले .यावेळी एपीआय मंगेश गोटला, एपीआय सुदर्शन वाघमारे, एपीआय हरिष भोये, एलसीबीचे एपीआय श्री. पळे यांच्यासह बाजारपेठचे 56 व एलसीबीचे 10 कर्मचारी, एक आरसीपी प्लाटून, 44 होमगार्ड तैनात होते. मिरवणूक शांततेत पार पडली.
डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन
सालाबाद प्रमाणे अनंत चतुर्दशीनिमित्ताने तापी नदीकाठी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे मार्फत डॉ. सचिन धर्माधिकारी व महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात शहरातील तापी नदीवरील पुलाच्या चारही बाजूंना त्याचप्रमाणे हतनुर धरणाजवळ 175 श्री सदस्याद्वारे 8151 घरगुती गणेश मंडळांचे निर्माल्य संकलन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 16 टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. या निर्माल्याचे लागलीच श्री सदस्यांद्वारे विलगीकरण करून त्यातील 8 टन निर्माल्याचे वर्षभरात करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमातील वृक्षांना खत निर्मिती करण्यासाठी पाठवण्यात आले. उरलेल्या निर्मल्याचे स्थानिक प्रशासनाच्या नियमांप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली. स्थानिक नागरिकांनी देखील विश्वासाने आपल्या जवळील निर्माल्य श्री सदस्यांकडे देत उपक्रमास सहकार्य केले.त्याचप्रमाणे बर्‍याच नागरिकांनी स्वतःहून यापुढे निर्माल्य प्लास्टिक बॅगमध्ये संकलित करणार नाही. असा स्वैच्छिक संकल्प केला. उपस्थित प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत करण्यात आलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली.

  • गणरायाला निरोप ; डिवाएसपीचे गणरायाला साकडे ! जागर पर्यावरण प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम*
    शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीचे शांततेत तसेच भक्तिमय वातावरणात तापी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले . कुठे हि अनुचित प्रकार घडु नये यासाठी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भुसावळ शहरातील जागर प्रतिष्ठान पर्यावरण मंचातर्फे घरगुती गणपती घेऊन त्या बदल्यात वृक्षाचे रोप वाटप करण्यात आले. भुसावळ शहर व परीसरात एक चांगला संदेश दिला जात आहे. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला . असल्याचे डीवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले आहे.

गणराया चरणी प्रार्थना

भुसावळ शहर हे गुन्हेगारी मुक्त शहर व्हावे. काही तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. तरुण वर्ग नशामुक्त होऊन त्यांनी उच्च शिक्षण घेऊन शहराचा , राज्याचा व देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असे गणपतीला साकडे घातले असल्याचे हि डिवाएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.
मागच्या वर्षी जागर पर्यावरण प्रतिष्ठान मंचने घरगुती गणपती बसविणाऱ्या नागरिकांना 175 वृक्षाचे वाटप केले होते .व ते सर्व वृक्ष जिवंत असल्याचे पर्यावरण प्रेमी नाना पाटील सर यांनी सांगितले आहे . वृक्षारोपण केल्याने भुसावळ शहरामध्ये एक निसर्गरम्य वातावरण निर्माण होईल . व त्याचा भविष्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदा होईल असे नाना पाटील यांनी म्हटले आहे.