भुसावळ – भुसावळ तालुका आणि शहर शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचा वर्धापनदिन मध्यवर्ती कार्यालयात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवसेना ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली.शिवसेनेच्यावतीने मिठाई वाटप करून तोंड गोड करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन, ज्येष्ठ शिवसैनिक शरद जोहरे आणि शिवभोजन केंद्राचे संचालक, नमा शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेच्यावतीने माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे म्हणाले की, दरवर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन आपण मोठ्या जल्लोषात साजरा करतो, तो यावर्षी भुसावळमधील या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला दुःखाची किनार आहे. कारण शिवसेना वाढीसाठी ज्यांनी जिवाचं रान केलं पक्षबांधणीसाठी स्वतःला झोकून दिले असे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचं नुकतच निधन झालेला आहे. निष्ठावंत आणि प्रामाणिक सच्चा शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र दायमा होते. कार्यकर्त्यांना जोडणं, जोपासन आणि कार्यकर्त्याला मोठ करण्याचं कौशल्य त्यांच्या जवळ होतं.भुसावळ पासून तर थेट मातोश्री आणि शिवसेना भवनापर्यंत त्यांच्या नावाचा एक दबदबा होता. शिवसेना बांधणीसाठी त्यांचं योगदान न विसरता येण्याजोग आहे.
असे श्रद्धांजलीपर मनोगत प्रा.धीरज पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांचेसह अन्य शिवसैनिक यांनी व्यक्त करून सहवासातल्या आठवणींना उजाळा दिला. सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन संतोष सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा धीरज पाटील यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



