भुसावळ – मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे पितळ जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उघडे झाले. श्रीनगरसह भुसावळ शहराच्या अनेक भागात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. देखभाल, दुरुस्तीचे काम अजूनही सुरू न झाल्याचे सांगत महावितरण हात झटकून मोकळी होत आहे. उन्हाळ्यात ग्राहकांना भारनियमनाच्या मिळालेल्या झटक्यानंतर आता विजेच्या लपंडावाचा खेळ सुरू असून, यात ग्राहकच भरडला जात आहे. मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी वीज वितरणात अडथळे येऊ नये, याकरिता ‘महावितरण’कडून मॉन्सूनपूर्व दुरुस्तीचे नियोजन आखण्यात येत असते. हे नियोजन दरवर्षी केले जाते, पण दरवर्षीच पावसाला सुरवात झाल्यानंतर वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार नवीन राहिलेले नाही. यंदा देखील वीज ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागते. तरी देखील ‘महावितरण’च्या या कारभारात वर्षानुवर्षे सुधारणा करण्याचे नियोजन आखण्यात आलेले नाही. दुरुस्ती केल्यानंतर देखील पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणारी आपत्कालीन व्यवस्था सोडविण्यासाठी हवी ती यंत्रणा ‘महावितरण’कडे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
मॉन्सूनला सुरवात होण्यास अजून प्रतीक्षा आहे. परंतु, सुरू झालेल्या वेगवान वाऱ्यामुळे ‘महावितरण’चा बोजवारा उडविला. महिनाभरापूर्वी मॉन्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात आले पाहिजे होते यात प्रामुख्याने तारांना अडणाऱ्या फांद्या छाटणे, डीपीमधील ऑईलची लेव्हल तपासणी, फ्यूज पेट्या दुरुस्ती, लोंबकळणाऱ्या व जीर्ण तारांची दुरुस्ती, पोल दुरुस्ती, इंन्सुलेटर्स टाकणे, अर्थिंग तपासणी यासारख्या कामांचे नियोजन अजूनही आखण्यात आले नाही. त्यामुळे श्रीनगर सह परिसरात अनेक ठिकाणी तार एकमेकांना स्पर्श करीत आहे. परिणामी विजेचा दाब कमी अधिक होत असून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसात दुरुस्ती कामे न झाल्यास महावितरण कार्यलयाच्या समोर नागरिकांतर्फे आंदोलन पुकारले जाईल असा इशारा विज ग्राहक गणेश पाटील, दामू राणे, राव साहेब माळी, अमोल पाटील, हेमंत कोळी व नागरिकांनी दिला आहे.
कमी अधिक विज दाबामुळे मागील वर्षी झालेल्या लाखो रुपयांची नुकसानभरपाई महावितरणने दिलेली नाही. परंतु वारंवार तक्रार केल्यावरही नुकसान झाल्यास महावितरणला जबाबदार धरले जावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

*फोटो ओळ: वीज तारांना स्पर्श करणाऱ्या तारा*…


