दीपनगर : दीपनगर प्रकल्पातील 34 वर्षीय कंत्राटी कर्मचार्याचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री निधन झाल्यानंतर तातडीने मृतदेह कर्मचार्याच्या मूळ गावी बिहारकडे रवाना करण्यात आल्याचे कळताच बुधवारी सकाळी कर्मचार्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मृत कर्मचार्यांच्या वारसास योग्य ती भरपाई द्यावी तसेच अन्य प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात तसेच मृत कर्मचार्याचा मृतदेह पुन्हा आणावा म्हणून कर्मचार्यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला. चार तास होवूनही अधिकारी न आल्याने कामगार अधिकच संतप्त झाले व त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी किरकोळ दगडफेक झाल्याचे समजते तर काही वाहनेही फेकण्यात आली.
आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून पांगवल्याचा प्रकार बुधवार, 5 रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या सुमारास घडल्याने दीपनगर परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.

समजलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र यादव (34, मूळ रा.बिहार, ह.मु.लेबर कॉलनी, दीपनगर) असे मृत कर्मचार्याचे नाव असून तो आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. इंडवेल कंपनीचा तो कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्मचार्याचे मृत्यु झाल्यानंतर घाईघाईने त्याचा मृतदेह बिहारकडे रवाना करण्यात आला
मात्र नियमानुसार या कर्मचार्याच्या वारसाला सर्व भरपाई देण्याची कंत्राटी कर्मचार्यांची मागणी होती. याप्रकारामुळे कामगार संतप्त झाले
दरम्यान, विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून आधीच कर्मचार्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्मचार्याच्या मृत्यूची वार्ता आल्यानंतर बुधवारी सकाळी 10.30 वाजता आंदोलकांनी मोर्चा काढून नवीन 660 प्रकल्पाच्या गेटवर नेला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले.रम्यान, यापूर्वी, दीपनगरातील जुन्या 210 प्रकल्पात कोळसा वाहून नेणार्या कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने 58 वर्षीय कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली होती. त्यावेळच्या दुर्घटनेत सफाई कामगार अशोक बाबूराव हातकर (58, फेकरी) या कामगाराचा मृत्यू ओढवला होता. विशेष म्हणजे सेवानिवृत्ती जवळ आली असतानाच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
दीपनगरात कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून वरीष्ठ अधिकार्यांनी अप्रिय घटना टाळण्यासाठी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे तसेच कर्मचारी सुरक्षिततेबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


