कोरोना संकट : राज्यात आज तब्बल 18 हजार 466 नवीन बाधीत आढळले –

मुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल 18 हजार 466 नवीन कोरोनाबाधीत आढळले असून चार हजार 458 रुग्णांनी कोरोनावर मात केली. काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजारांच्या संख्येने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागते लागते की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

राज्यात आज 75 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 75 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 653 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

मागील दहा दिवसातील रूग्ण संख्या
3 जानेवारी – 12, 160 रूग्ण
2 जानेवारी – 11, 877 रूग्ण
1 जानेवारी – 9,170 रूग्ण
31 डिसेंबर – 8067 रूग्ण
30 डिसेंबर – 5368 रूग्ण
29 डिसेंबर – 3900 रूग्ण
28 डिसेंबर – 2172 रूग्ण
27 डिसेंबर – 1426 रूग्ण
26 डिसेंबर – 1648 रूग्ण
25 डिसेंबर – 1485 रूग्ण

राज्यात आज 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात मंगळवारी 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 66 हजार 308 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 18 हजार 916 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के आहे. सध्या राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 95 , 09, 260 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 10 हजार 860 रुग्णांची भर
मुंबईत आज 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सोमवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तो चिंतेचा विषय आहे.