भुसावळ (प्रतिनिधी )-
शासनाकडून बालक आणि गरोदर मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहारांतर्गत साखर, तांदूळ, मसूर दाळ, गहू, हरभरा, हळद, तिखट, मीठ आदी एकूण 9 किलो आहार दर महिन्याला दिला जातो मात्र तालुक्यातील शिंदी येथील अंगणवाडीतील शालेय पोषण आहाराची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याची तक्रार जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांना काही ग्रामस्थांनी केली होती. त्याची दखल घेत सावकारे यांनी मंगळवारी सायंकाळी गावात जाऊन अंगणवाडीत तपासणी केली. यावेळी अंगणवाडी अधीक्षकांनी 2019 पासून आपल्याकडे तांदूळ येत नसल्याचे सांगितले मात्र सावकारे यांनी रजिस्टर आणि पावती मागितल्यानंतर त्यावर तांदूळाचा साठा मिळत असल्याचे दिसून आले त्यामुळे संतप्त झालेल्या पल्लवी सावकारे यांनी अंगणवाडी अधीक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी तालुका पोषण आहार अधीक्षकांनी अंगणवाडीला कुलूप लावत व रजिस्टर ताब्यात घेण्यात आले. यावेळी 46 लाभार्थींच्या बोगस सह्या घेऊन मालाचे वाटप झाल्याचे दर्शवण्यात आले असलेतरी प्रत्यक्षात बुधवारी अधिकार्यांनी अंगणवाडीतील गोदाम तपासणी केली असता त्यात तांदळाचा साठा पडून असल्याचे दिसून आले.
या प्रकारानंतर बुधवार, 19 रोजी सकाळी पुन्हा जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी गायकवाड यांच्यासमवेत गावात जाऊन अंगणवाडीला भेट दिली. यावेळी अधिकार्यांनी रजिस्टर तपासले असता जवळपास 46 लाभार्थींच्या बोगस सह्या घेऊन मालाचे वाटप दाखविण्यात आल्याचे दिसून आले तर अंगणवाडीत गोदाम तपासणी केली असता त्यात तांदळाचा पूर्ण साठा तसाच पडून असल्याचे दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. गावातून कामानिमित्त बाहेर गेलेेल्या लोकांच्या बनावट स्वाक्षर्या करण्यात आल्याचाही आरोप आहे. याप्रसंगी अंगणवाडी निरीक्षक उज्वला पाटील, सरपंच निता जाधव, उपसरपंच कैलास पाटील, पोलिस पाटील, अतुल पाटील आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
दोघा अंगणवाडीत आढळला साठा
शिंदी, ता.भुसावळ येथील दोघा अंगणवाडीत लाभार्थीना पोषण आहार दिला जातो. यात प्रत्येकी एक किलो साखरेसह तांदूळ, मसूर दाळ, गहू, हरभरा, हळद, तिखट, मीठ आदी एकूण 9 किलो आहार दर महिन्याला दिला जातो. या अंगणवाड्यांमध्ये 104 लाभार्थी आहेत मात्र या महिन्यात गोरगरीब लाभार्थींना दिल्या जाणार्या खाऊच्या बोगस सह्या करून तो वाटप झाल्याचा आरोप आहेतर प्रत्यक्ष पाहणीत मात्र हा साठा अंगणवाडीत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका अंगणवाडीत 25 तर दुसर्या अंगणवाडीत 42 लाभार्थींचा साठा आढळून आल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात संबंधित विभागाच्या कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.



