ईसीसी सोसायटीकडून नियमांच्या अधीन राहूनच कर्जमंजुरी : पुष्पेंद्र कापडे


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या ईसीसी सोसायटीमध्ये भागधारकांसाठी राबवली जाणारी कर्ज प्रक्रिया ही नियमाच्या अधीन राहूनच केली जाते. यामध्ये कर्जासाठी अर्ज केल्यास पाच दिवसांच्या आत तरतुदीनुसार कर्ज मंजुरी दिले जात असून, विरोधकांकडून करण्यात आलेली तक्रार अवास्तव स्वरूपात असल्याची माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मंडळ अध्यक्ष पुष्पेन्द्र कापडे यांनी दिली.
रेल्वेच्या एसएससी सोसायटीमध्ये लोन स्वीकृतीमध्ये विलंब आणि भागधारकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात आज नॅशनल रेल्वे मजदूर युनियन तर्फे पत्रकार परिषद घेण्यात येऊन यावर खुलासा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. कापडे म्हणाले की, विरोधकांनी बँकेच्या प्रांगणात जाऊन व्यवस्थापकांशी वाद घातला होता. त्यांना लवकरात लवकर एकाच दिवसात कर्ज देण्यात यावे अशी मागणी केली. तेथील महिला व्यवस्थापकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत घातली. यावेळी सी आर एम एस तर्फे क्रेडिट कार्ड आणि एटीएम देण्याची मागणी करण्यात आली. मात्र ईसीसी सोसायटी ही मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असून, को-ऑपरेटिव्ह बोर्ड दिल्ली कडून मिळालेल्या नियमांचे पालन करते. त्यामुळे एटीएम आणि क्रेडिट कार्ड देणे नियमबाह्य असल्याचे श्री. कापडे म्हणाले. तसेच लोन संदर्भात प्राप्त अर्जांची छाननी करून पाच दिवसांच्या आत संबंधित भागधारकास लोन दिले जाते. तर अत्यावश्यक स्थितीमध्ये 5 तासांमध्ये देखील कर्ज मंजूर केले जाते. मात्र विरोधक यासंदर्भात तथ्यहीन आरोप करीत आहेत. विरोधकांना या प्रक्रियेचे अज्ञान असून ते केवळ कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे कापडे म्हणाले. याप्रसंगी पत्रकार परिषदेस एनआरएमयु चेअरमन आर. पी. भालेराव, इसीसी सोसायटीचे संचालक पी. पी. बेंडाळे, आर. आर निकम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *