भुसावळ (प्रतिनिधी )-
नाथ संप्रदायातील थोर विभूती प.पु.स्वामी विद्यानंद महाराज पुणे यांनी दिनांक २५/०९/२०२० रोजी आपली इहलोकीची यात्रा पूर्ण करून वैकुंठाकडे गमन केले. त्यांचे वय ९७ वर्षे होते नाथ संप्रदायातील सोहम साधनेची दीक्षा ते देत असत .ते स्वतः थोर सद्गुरु पदी विराजमान होते. त्यांचा फार मोठा शिष्यपरिवार महाराष्ट्र गोवा तसेच भारताबाहेरही सोहम साधना करीत आहे. आपल्या पुणे येथील दिव्य जीवन वाटिका आश्रम येथे त्यांचे वास्तव्य होते .आपल्या साधनेच्या बळावर ते आत्मस्थिती पर्यंत जाऊन पोचले होते. स्वामीजींना महायोगी अरविंदांच्या तत्वज्ञाना बद्दल अपार प्रेम होते. त्यांचा जळगाव येथे खोटे नगर याठिकाणी देखील आश्रम आहे. स्वामीजींनी सुमारे ५० पेक्षा अधिक अध्यात्मिक ग्रंथ लिखाण केले आहे.
भुसावळच्या श्री संत ज्ञानेश्वर मंडळात ते नेहमी संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने येत असत. शहरात अध्यात्मिक प्रसारात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने अध्यात्मिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो ही प्रार्थना स्वामी विद्यानंद सेवा मंडळ शाखा भुसावळ व त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य भक्त करीत आहेत. ओम शांती



