भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना बाधित किंवा संशयीत रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह पिशवीत पॅक करून दिला जात असतो. अशात दफनविधी करण्यापुर्वी आईचा चेहरा पहायचा म्हणून मुलाने हट्ट धरला. यामुळे केवळ चेहरा दाखविण्यासाठी पिशवी उघडली असता ही तर आपली आईच नसल्याचे मुलाच्या लक्षात आले. यामुळे प्रशासनाच्या गलथान कारभाराने दोन पॅक केलेल्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला.
शहरातील मुस्लिम कॉलनीतील कोरोना बाधित वृद्ध महिलेचा मृतदेह जळगाव येथील मयत वृद्धेच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. ही अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आमदार संजय सावकारे आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह गोदावरी रुग्णालयात सुपूर्द करून मूळ मृतदेह ताब्यात घेत, त्याचे मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याने तणाव निवळला.
भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तीन दिवसांपूर्वी अस्वस्थ आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी या महिलेस गोदावरी रुग्णालयातील सेंटरमध्ये हलविले. त्यानंतर गुरुवारी . ३रोजी रात्री महिलेच्या नातेवाईकांना गोदावरी रुग्णालयातून ही महिला मृत झाल्याचे दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले होते. शुक्रवार दिनांक ४ रोजी सकाळी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो निगेटिव्ह अहवाल असल्याचे सांगत याचे शासकीय निकष पाळून रितीरिवाजानुसार दफन करण्याच्या सूचना तेथील अधिकाऱ्यांनी दिल्या.
महिलेच्या नातेवाईक मृतदेह दफनभूमीत नेत होते. तेव्हा आईच्या देहाचे दफन करण्यापूर्वी एकदा तरी तिचा चेहरा पहायचाय असा हट्ट मुलांनी धरला. यामुळे मृतदेह उघडण्यात आला. मात्र मृतदेह उघडून पाहिले असता हा मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार आणि आमदार संजय सावकारे यांनी मुस्लिम कॉलनीकडे धाव घेतली.
गोदावरी महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस आला. तर सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढून हा मृतदेह गोदावरी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये परत केला .तर भुसावळ येथील मुस्लिम कुटूंबाला सोपविण्यात आलेला महिलेचा मृतदेह जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेचा होता. तर दादावाडीतील महिलेच्या कुटूंबियांना भुसावळ येथील महिलेचा मृतदेह देण्यात आला होता.
कोरोना रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसऱ्या महिलेचा मृतदेह दुसरीकडे देणे गलथान कारभार असून, ही अक्षम्य अशी बाब आहे. मृताच्या नातेवाईकांच्या भावनांशी प्रशासन खेळत असून, संबंधीत जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले .



