बालरक्षकांच्या मदतीने शाळाबाह्य मुलीला मिळाला शाळा प्रवेश

भुसावळ (प्रतिनिधी): –
येथील बालरक्षक शिक्षक नाना पाटील व बालरक्षक अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील या दोघांच्या मदतीने शाळाबाह्य मुलीला शाळा प्रवेश मिळाला आहे.
याबाबत माहिती अशी की, कुलसुम जावेद इराणी हिच्या आईवडिलांचा चष्मा विक्री हा भटक्या स्वरूपाचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते ज्या गावाला जायचे तेथे कुलसुमला त्यांच्यासोबतच काही दिवस थांबावे लागायचे. त्यामुळे तिचे शिक्षण जवळपास तिसरीपासून सुटले होते. मुलगी हुशार आहे. गेल्या एक-दोन वर्षापासून ते भुसावळ येथे आले व इराणी वस्तीत राहू लागले. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या कायद्यानुसार वयानुरूप विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. यानुसार भुसावळ येथील सु. ग. टेमानी कन्या विद्यालयातील शिक्षिका सौ. अश्विनी बोरसे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थीनी यांना आवाहन केले की, आपल्या भागात शाळेत न जाणार्‍या मुली असतील तर मला सांगावे. त्यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सदर मुलीला शाळेत आणले. त्यावेळी सौ.अश्विनी बोरसे मॅडम यांनी तिच्या आईला बोलावून शाळेत दाखल करण्यास सांगितले. यावेळी मुख्याध्यापक मनोज माहेश्वरी सरांनी बालरक्षक शिक्षक नाना पाटील यांना माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेऊन प्रवेश देण्याचे सांगितले. त्याचवेळी जिल्ह्याचे बालरक्षक अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांचेही मार्गदर्शन घेऊन त्यांनी प्रत्यक्ष येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी प्रा. शैलेश पाटील यांनी त्या विद्यार्थिनीचे स्वागत करून शिक्षक व पालकांशी संवाद साधला. कोणतेही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. परंतु कोणतेही मूल शिक्षण हक्कापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही प्रा. पाटील यांनी केले. मुख्याध्यापक मनोज माहेश्वरी यांनी पालकांना आवाहन केले की, आपल्या परिसरात असे मुलेमुली असतील तर केव्हाही आम्ही प्रवेश देऊ. इराणी कुटुंब चष्मेविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने सतत स्थलांतर करीत असायची. परंतु सध्या या महामारीच्या काळात कुलसुमचे भुसावळ येथे वास्तव्य होते. सदर विद्यार्थिनीविषयी माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षिकेला दिली. सु. ग. टेमाणी हायस्कूल भुसावळ येथे कार्यरत शिक्षिका श्रीमती अश्विनी रमेश बोरसे यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यामुळे मी आणि बालरक्षक म्हणून कार्य करणारे नाना पाटील, आश्विनी बोरसे यांनी कुलसुमच्या पालकांना भेटून संवाद साधला. त्यांनी तिला शिकू देण्याचे मान्य केले. सदर विद्यार्थिनीची अभ्यासाची तयारी करून घेण्याची व तिला इतर मुलांच्या बरोबरीने आणण्याची जबाबदारी अश्विनी बोरसे यांनी घेतली आहे. शाळाबाह्य मुलीला शाळेच्या प्रवाहात आणल्याबद्दल बालरक्षकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *