भुसावळात कोरोनावर मात करीत योद्धा पुन्हा कर्तव्यावर ; सहकार्यानी केले स्वागत ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
बाजारपेठ पोलिस ठाण्यातील नऊ कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार होऊन ते घरी आल्यानंतर शुक्रवारी सर्व कर्मचारी पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले. कोरोना योद्धा पोलीस ठाण्यात आल्यावर डीवायएसपींसह पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले. बाजारपेठ पोलिस ठाण्यातील एक पोलिस हवालदार कोरोणा संसर्गामुळे मरण पावल्यावर पोलीस ठाण्यातील १२ पोलीस कर्मचार्‍यांना हा संसर्ग झाला यानंतर तीन कर्मचार्‍यांवर जळगाव येथे तर नऊ कर्मचार्‍यांवर भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. उपचार झाल्यानंतर सर्व कर्मचारी यांना आठवडाभर होम क्वाँरंटाईन केले होते. शुक्रवारी सर्व नऊ कर्मचारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाले.
सर्व कर्मचारी अकरा वाजता पोलीस ठाण्यात गणवेश परिधान करुन आले होते. डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी कोरोना योद्धा कर्मचार्‍यांवर फुलांचा वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले .यावेळी पोलीस ठाण्यातील सर्वच कर्मचारी पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचार्‍यांना गुलाबपुष्प देऊन अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.
बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्यावर त्यांचे अन्य सहकारी दररोज त्यांच्याशी रेल्वे हॉस्पिटल मध्ये संपर्क साधून होते. शुक्रवारी सर्व कर्मचारी हजर झाल्यावर आपल्या मित्रांना आणि सहकार्‍यांना भेटून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आम्ही कोरोनाबाधीत असताना आपण सर्वांनी खूप प्रेम दिले आणि अधिकार्‍यांनी सुद्धा दररोज आस्थेवाईकपणे चौकशी केली या बद्दल आम्ही सर्व सहकार्‍यांचे व अधिकार्‍यांचे ऋणी आहोत, असे उद्गार पोलिस कर्मचारी विकास सातदिवे यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *