जीवन अमूल्य आहे , रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास टाळा – भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती

भुसावळ (प्रतिनिधी )-
लॉकडाऊनमुळे सुमारे दिड महिन्यांपासून अडकून पडल्यानंतर मध्यप्रदेशात जाण्यासाठी भुसावळाहून रेल्वे सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जालन्यातील १९ मजूर पायीच भुसावळच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरून निघाले होते मात्र चालून दमल्यानंतर या मजुरांना झोप लागल्याने ते रेल्वे रूळावर झोपी गेले असतानाच भल्या पहाटे आलेल्या मालेगाडीने या मजुरांना चिरडल्याने तब्बल १६ मजुरांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. जालना-औरंगाबाद मार्गावरील करमाडजवळ शुक्रवारी पहाटे ही घटना घडली होती. यानंतर अप्रिय घटना टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे रूळांवरील गस्त वाढवली आहे तर भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे रूळावरून चालून पायी प्रवास न करण्याबाबत फलक लावून जनजागृती सुरू केली आहे.
जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करणारे मजूर रात्रीच जालन्याहून भुसावळ रेल्वे स्थानकावर येण्यासाठी पायी निघाले होते व तेथून ते मध्यप्रदेशात जाणार होते मात्र चालून दमल्यामुळे ते रेल्वे रूळावरच थांबले आणि तिथेच झोपल्यानंतर भल्या पहाटे आलेल्या मालगाडीने या मजुरांना धडक दिल्यानंतर १६ मजुरांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू ओढवला होता. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे रूळांवरील गस्त अधिक वाढवली आहे.तसेच
भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक डी.एस.डंबाळे यांनी रेल्वे रूळावरून प्रवास करणार्‍या परप्रांतीय प्रवाशांसाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावले आहेत. त्यात आपले जीवन अमूल्य आहे – रेल्वे ट्रॅकने प्रवास करू नये त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा संदेश देवून रेल्वे रूळावरून प्रवाशांनी प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. या शिवाय रेल्वे ट्रॅकवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *