आरोग्यापेक्षा परिक्षा महत्वाच्या नाहीत – मुंबई छात्रभारतीचे शालेय शिक्षणमंत्री व उच्च शिक्षण मंत्र्यांना पत्र

मुंबई –
छात्रभारती मुंबईच्या वतीने आज मा.शिक्षणमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांना पत्र लिहुन महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात काही जोखमीचे व जिगरीचे निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची विनंती केली आहे.
परिक्षांपेक्षा मुलांचे आयुष्य महत्वाचे आहे. ९ वी ११ वी च्या मुलांना सरासरी गुण देऊन पासज केल्यास घरी राहुन त्यांना पुढच्या इयत्तेचा अभ्यास करता येऊ शकतो सध्या मुले संभ्रमात आहेत त्यांच्यावर ताण वाढतोय, १० वी च्या मुलांचाही भुगोलाचा पेपर रद्द करुन झालेल्या ५ पेपरच्या अनुषंगाने त्यांचा निकाल लावावा..१२ वी चे पेपर झाल्याने शिक्षकांना हे पेपर काही ठराविक मनुष्यबळ वापरुन घरीच तपासणीसाठी दिल्यास निकाल लवकर लागुन आॕनलाईन अॕडमिशन वेळेत चालु करता येईल अश्या प्रकारे ९ वी ते १२ वी च्या मुलांचा प्रश्न आपण सोडवु शकतो असे छात्रभारती मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी सुचविले..
१३ वी ते १५ वी व पुढील पदव्युत्तर परिक्षा या शक्यतो लाॕकडाऊन संपल्यानंतर परिस्थितीनुरुप योग्य निर्णय घेऊन परिक्षा घ्याव्यात.. सध्या आॕनलाईन परिक्षांचा विचार चालु आहे परंतु आपण त्याची अंमलबजावणी योग्य स्वरुपात करु शकतो का? आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे का? प्राध्यापकांना त्याचे ट्रेनिंग कसे देता येईल? या सर्वांचा सारासार विचार करावा.. विशेषतः मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीच्या आॕनलाईन असेसमेंट पध्दतीमुळे लाखो मुलांना हैराण करुन सोडले होते हे विसरता कामा नये. साधा शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना हजारो विद्यार्थी अर्ज भरण्यापासुन वंचित राहतात व सर्व प्रशासन व्यवस्था हात झटकुन आमचे कार्यक्षेत्र नाही म्हणून लांब पळते. विशेषतः मुंबईत करोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे त्यात वाढीव मनस्ताप आॕनलाईन पेपरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देऊ नका. मुंबई विद्यापीठ निकाल लावणे,पुर्नमुल्यांकन अश्या अनेक माध्यमांतुन हजारो मुलांना वेठीस धरण्यात माहीर आहे.मुंबई विद्यापीठाचे प्रमुख म्हणजे बोलाचाचा भात बोलाचीच कढी अश्या प्रवृत्तीचे आहेत खुप काही बोलतीत पण अंमलबजावणीत मागे पडतील व अडचणी आल्या कि प्रशासनावर ढकलुन स्वतः मात्र हात वर करतील. त्यामुळे सर्व बाबींचा योग्य तो विचार करुनच निर्णय व्हावा ही अपेक्षा मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *