जळगाव
शहरातील बेंडाळे महाविद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थीसह तिची मैत्रिण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विद्यार्थीनीसह तिच्या मैत्रिणीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद असून त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील रहिवासी विद्यार्थी बेंडाळे महाविद्यालयात 11 वीला शिक्षण घेत आहे. 13 रोजी महाविद्यालयात परीक्षा असल्याने विद्यार्थीनी गल्लीतच राहणार्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयात गेली. सकाळी 7 वाजेपासून गेलेली विद्यार्थीनी परत न आल्याने तिच्या पालकांनी ज्या मैत्रिणीसोबत आपली मुलगी गेली आहे, तिच्या घरी जावून चौकशी केली. तर मैत्रीण सुध्दा घरी नसल्याचे समजले. कुटुंबियांनी शहरात रहिवास करणार्या नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र विद्यार्थीनीसह तिची मैत्रीण मिळून आली नाही. विद्यार्थिनीकडे मोबाईल असून तिचा संपर्क क्रमांक बंद येत आहे. विद्यार्थीनी तिच्या मैत्रिणीसोबत दिल्ली येथे जाण्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. सर्वत्र शोध घेवूनही मिळून न आल्याने पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघींना कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



