सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समानतेचे – मंगला पाटील

भुसावळ, (प्रतिनिधी )-
‘सध्याचे युग हे स्त्री-पुरुष समतेचे आहे. अशा काळात स्त्रीवर्गाला अपमानास्पद होणारा भेदभाव करणे हे काळाशी सुसंगत नाही. मुलगा जन्मला म्हणजे हर्षांने बेधुंद व्हावे आणि मुलगी जन्मली म्हणजे शोक करीत बसावे याचे कारण काही माझ्या ध्यानात येत नाही. दोन्ही ईश्वराची देणगी होत. दोघांनाही जगण्याचा सारखाच हक्क आहे आणि जगाची रहाटी चालू ठेवण्यासाठी दोघांचीही सारखीच गरज आहे.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजिका मंगला पाटील यांनी भुसावळ येथील जळगाव रोड परिसरात महिला दिनानिमित्त आयोजित “महिला सन्मान सोहळा” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करतांना केले.
रविवार ८ रोजी विवाह समारंभाची कडक तिथी असून सुध्दा या अराजकिय कार्यक्रमास सायंकाळच्यावेळी सुमारे ५०० महिलांची उपस्थिती होती. व्यासपीठाहून जेव्हा मान्यवर महिला उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या तेव्हा जळगाव रोडहून ये- जा करणारे नागरीक थांबवून या मार्गदर्शनाचा लाभ घेत होते. असा हा महिलांनी महिलांसाठी घेतलेला या परिसरातील पहिलाच कार्यक्रम होता.
या वेळी मंचावर कार्यक्रम अध्यक्ष मंगला पाटील, मार्गदर्शक आरती पाटील, भुसावळ न.प. मुख्याधिकारी करुणा डहाळे, अ‍ॅड. स्वाती पाटील, भारती मस्के, समिती अध्यक्षा प्रा.सीमा पाटील, सचिव कविता ठोके, उपाध्यक्षा ज्योत्स्ना खैरनार, प्रभा पाटील, मोना भंगाळे, प्रा डॉ शुभांगी राठी, आशा तडवी, शारदा धांडे, प्रज्ञा ढाके, मिनाक्षी धांडे, उषा रमेश भोई, टीना धांडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्धाटन भुसावळ न.प. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आजी – माजी सैनिक माता, पत्नी, शेतकरी, कामगार, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, महिला शिक्षक, जेष्ठ महिलांचा व होतकरू व कर्तृत्ववान महिलांसोबत सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक, पत्रकार यासह विविध क्षेत्रात कार्यरत १०० महिलांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी या वर्षांत अत्याचाराने जीव गमवावा लागलेल्या महिलांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
आजची स्त्री सक्षम : करुणा डहाळे
’प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, हे आपण वर्षानुवर्षे वाचत आलो आणि ’पुरुषामागे’ असण्यातच स्त्रियांनी धन्यताही मानली. पण आता स्त्री सक्षम झाली आहे, तिचे सामर्थ्य जगासमोर आले आहे. स्त्री – पुरुष समानतेचा आणि परस्पर सहकार्याचा अत्यंत आवश्यक असा नवा विचार रुजू करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. असे मत करूणा डहाळे यांनी मांडले.
विविध विषयांचे मार्गदर्शन
आरती चौधरी यांनी मुलींना घरातून आईच चांगले संस्कार देऊ शकते कारण आई एक चांगली समुपदेशक असते, ऍड. स्वाती पाटील यांनी लैंगिक अत्याचार विरोधात असलेल्या कायद्याचे मार्गदर्शन केले, आशा तडवी यांनी वैवाहिक जीवनात होणार्‍या छोट्या मोठ्या भांडणाने घरसंसार कसा मोडतो त्याची माहिती दिली, तर भारती मस्के यांनी किशोरवयीन मुलींना समुपदेशन केले. तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रा.सीमा पाटील, ज्योत्स्ना खैरनार, कविता ठोके, प्रीती राणे, पूजा खैरनार, योगिता दुसाने, रुपाली पाथरवट, ललिता पाटील, कोमल पाटील, पल्लवी कोळी, ललिता कोळी, नयना बोंडे, प्रतिभा चौधरी, अर्चना झटकार, भारती झांबरे, सुषमा खैरनार, सुवर्णा पाटील यांनी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित महिलांकडून मोफत कुपन भरुन घेण्यात येवून लकि ड्रॉ काढण्यात आला.विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आली तसेच उपस्थित महिलांना महिलांनीच भेटवस्तु देवून सन्मानित केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *