भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रेल्वे विद्युत इंजिन कारखान्यात तयार करण्यात आलेले एक व कारखान्या समोरील भुसावळ एमओएच मध्ये तयार करण्यात आलेले एक अशा दोन रेल्वे इंजिनांचे लोकार्पण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते दि.६ मार्च शुक्रवार रोजी करण्यात आले. यावेळी भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता,विद्युत इंजिन कारखान्याचे मुख्य प्रबंधक शिवराम,प्रधान मुख्य विद्युत अभियंता अतुल पाठक,प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी ए.के.सिन्हा,प्रधान मुख्य संरक्षा अभियंता सुशील पी.वावरे यांच्यासह कारखान्यातील विविध अधिकारी आणि भुसावळ मंडळातील रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
महाप्रबंधक संजीव मित्तल आज दि.६ मार्च रोजी भुसावळ पाहणी (निरीक्षण) दौऱ्यावर आले होते. त्यांनी भुसावळ येथील रेल्वे विद्युत इंजिन कारखाना आणि क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली तसेच सकाळी जागतिक महिला दिनानिमित्त आज भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस असलेल्या रेल्वे परिसरात आयोजित एक नुक्कड नाटिका बघितली. शुक्रवार रोजी सकाळी आपल्या विशेष गाडीने भुसावळ येथे आगमन झाल्यानंतर महाप्रबंधकांनी भुसावळ स्थानकाचे निरीक्षण केले. त्यानंतर रेल्वे हायस्कुल, भुसावळ द्वारा आयोजित तथा महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश कुळकर्णी दिग्दर्शित रेल्वे महिला कर्मचाऱ्यांनी “अभियान हर एक के लिये समान ” विषयावर आधारित नाटिका सादर केली. नाटिका बघून प्रभावित झालेल्या महाप्रबंधक मित्तल यांनी नाटिकेचे सूत्रधार तथा दिग्दर्शक प्राचार्य सतीश कुलकर्णी आणि त्यांच्या सह रंगकर्मींना रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. नंतर मित्तल यांनी रेल्वे विद्युत इंजिन कारखान्याचा निरीक्षण दौरा प्रारंभ केला. सर्वप्रथम त्यांनी विद्युत इंजिन कारखान्यात कशा पद्धतीने कार्य चालते याची माहिती जाणून घेतली. नंतर विद्युत इंजिन कारखान्याच्या राजभाषा विभागातर्फे सादर करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व विद्युत इंजिन कारखान्याद्वारे बनविण्यात आलेल्या दुसऱ्या वातानुकूलित कॅब असलेल्या रेल्वे इंजिन (डब्ल्युएजी -७ श्रेणीतील इंजिन क्रमांक २७१०२ कल्याण लोकोचे विधीवत उद्घाटन करून त्याचे लोकार्पण केले. त्यानंतर महाप्रबंधक मित्तल यांनी अडगळीत पडलेल्या एका रेल्वे इंजिनाला पुनर्निर्मित करून व ड्युअल ऑपरेटिंग सिस्टिम आधारित डब्ल्युएजी-५ श्रेणीतील भुसावळच्या “गरुड” रेल्वे इंजिनाचे सुद्धा लोकार्पण केले.
त्यानंतर कारखान्यातील मोकळ्या जागी वृक्षारोपण करून इरेक्शन फाईव्ह विभागातील एलईडी वीज दीव्यांचे उद्घाटन केले व पाहणी केली दुपारी दोन वाजे नंतर त्यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन तेथील निरीक्षण केले.



