भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रोटरी रेल सिटी तर्फे आयोजित सायक्लोथॉनला भुसावळकरांनी उदंड प्रतिसाद दिला. यात आबालवृद्धांसह शिक्षक, व्यापारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पहाटे पासुनच विद्यार्थी आपापल्या सायकल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जमु लागले होते. यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकही सहभागी झाले होते. शिवाय ज्येष्ठ नागरिकांचाही यात सहभाग होता. खा.रक्षा खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे आदींनी हिरवी झेंडी दाखवून सायक्लोथॉनचे उद्घाटन केले. प्रदूषण मुक्त भुसावळचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही एक सायकल रॅली होती.शहर पोलीस ठाणे, महाराणा प्रताप चौक,लोखंडी पूल, जामनेर रोड तसेच हॉटेल हेवन येथून वळसा घालून दगडी पूला खालुन घाशीलाल हॉटेलला वळसा घालून दशमेश मार्गाने येऊन पुन्हा मैदानावर रॅलीचा समारोप झाला. एकूण ६००मुले व नागरिक यांनी सहभाग घेतला .सहभागींच्या बीबी नंबर वरुन लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात ऋत्विक फालक,सार्थक पाटील,प्रा. प्रवीण पाटील या तिघा विजेत्यांना एस. के. बाईक तर्फे सायकली बक्षीस देण्यात आल्या. शिवाय इतर विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी आ.संजय सावकारे, कर्नल करुण ओहरी,प्रवीण मुळे, किशोर महिरे,मोहनकुमार दर्डा, रोटरीचे प्रांतपाल चेतन पाटील,रेल सिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार,प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.तसेच गोव्याच्या बीचवरुन २५० किलोमीटर अंतराचा खडतर प्रवास सायकल वरुन पुर्ण केल्या बद्दल त्वचारोगतज्ज्ञ डॉ. निलेश भिरुड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कर्नल करुण ओहरी यांनी सायकल चालवण्याचे महत्त्व विषद केले. संदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे व रेल सिटीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.



