भुसावळ तालुक्यातील २८ अंगणवाड्या होणार स्मार्ट; ४६ लाखांहून अधिक निधीची तरतूद ;

मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश; ४६ लाखांहून अधिक निधीची तरतूद

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भुसावळ तालुक्यातील २८ अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी योजनेचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमासाठी शासनाकडून एकूण ४६ लाख ७ हजार ६८० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण भागातील बालकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. या निर्णयात भुसावळ तालुक्यातील एकूण २८ अंगणवाडी केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

स्मार्ट अंगणवाडी किटच्या एका संचाची किंमत जीएसटीसह १ लाख ६४ हजार ५६० रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भुसावळ तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांसाठी एकूण ४६ लाख ७ हजार ६८० रुपयांची निधी तरतूद प्राप्त झाली आहे.

भुसावळ तालुक्यातील २२ गावांना लाभ
मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे भुसावळ तालुक्यातील कंडारी, खडके, जाडगाव, निंभोरा बु., सावतर, सुसरी, कन्हाळे बु., किन्ही, साकरी, भिलमळी, चोरवड, गोजोरे, कु-हा पा., खेडी, महादेव माळ, दर्यापूर, काहुरखेडा, मानपूर, तळवेल, गोंभी, वराडसिम आणि फूलगाव या गावांमधील अंगणवाडी केंद्रांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज होणार अंगणवाड्या
स्मार्ट अंगणवाडी किटच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये आरोग्य, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाशी संबंधित विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बालकांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच अंगणवाडी केंद्रांचे वातावरण अधिक आकर्षक, स्वच्छ आणि सुरक्षित बनविण्यास मदत होणार आहे.

बालकांच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना
अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या जातात. स्मार्ट अंगणवाडी उपक्रमामुळे बालकांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.

मंत्री संजय सावकारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भुसावळ तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.