भाजप गटनेते युवराज लोणारी यांचा चौधरींवर घणाघात; ‘हिम्मत असेल तर निवडणूक लढवून दाखवा’, खुले आव्हान; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन भुसावळ (प्रतिनिधी) : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून भुसावळ शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देताना भाजपचे नगरपरिषदेतील गटनेते युवराज लोणारी यांनी चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली. अनिल चौधरी यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व नसून, अनिल चौधरी हे राजकीय बेरोजगार आहे, शहरातील राजकीय वातावरण जाणीवपूर्वक बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, राजकीय वैफल्यातून ते शहरात अफवा पसरवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ‘हिम्मत असेल तर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवून दाखवावी,’ असे खुले आव्हान देत नागरिकांनी त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही लोणारी यांनी केले. अनिल चौधरी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी युवराज लोणारी यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत भाजपची भूमिका स्पष्ट करत चौधरी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीपासून ते विविध राजकीय पक्षांतील भूमिकेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. ‘एसआयआर म्हणजे काय, हेच चौधरींना माहीत नाही’ मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) ही निवडणूक आयोगाची अधिकृत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत मतदारांची पडताळणी केली जात असून, बीएलओ घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. दुबार नावे, मृत मतदारांच्या नोंदी आणि अपात्र नोंदींची पडताळणी करणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे खऱ्या मतदारांनी घाबरण्याचे कारण नाही. कोणत्याही पात्र मतदाराचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही, असे लोणारी यांनी स्पष्ट केले. तसेच मतदार यादीत बेकायदेशीररीत्या समाविष्ट झालेल्या परदेशी नागरिकांच्या नोंदींचीही नियमानुसार पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या यांच्यासंदर्भातील नोंदींचीही नियमांनुसार तपासणी व्हावी, या देशात अनेक घुसखोरी केलेले नागरिक आढळले, घुसखोरी करून देश विरोधी कारवाई करतात म्हणून एस आर आय प्रक्रिया आवश्यक आहे व देशभरात राबविण्यात येत आहे ही प्रक्रिया पारदर्शक आहे अफवा फैलविणे अत्यंत चुकीचे आहे अशीही भूमिका युवराज लोणारी यांनी यावेळी मांडली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचे संरक्षण करणे आवश्यक आहे. मात्र, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याच्या प्रक्रियेबाबत गैरसमज पसरविणे योग्य नाही. मतदार यादीत बेकायदेशीररीत्या समाविष्ट झालेल्या परदेशी नागरिकांच्या नोंदींचीही नियमानुसार पडताळणी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘अनिल चौधरी यांचे राजकीय अस्तित्व संतोष चौधरींमुळेच’ अनिल चौधरी यांच्या राजकीय कारकिर्दीवर टीका करताना लोणारी म्हणाले की, चौधरी यांनी आजपर्यंत स्वतःच्या ताकदीवर निवडणूक जिंकलेली नाही. ते कधी यावलमधून, तर कधी रावेरमधून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व संतोष चौधरी यांच्यामुळेच असल्याचा दावा त्यांनी केला. विधानपरिषद निवडणुकीत अनिल चौधरी यांनी स्वतः उमेदवारी न करता पाठिंबा दिला. त्यांनी निवडणूक लढविली असती, तर त्यांना केवळ दहा मते मिळाली असती, असा दावाही लोणारी यांनी केला. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्षांतर केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. मंत्री संजय सावकारे यांच्यावरील वक्तव्यावर आक्षेप अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांवर आणि एकेरी उल्लेखावर युवराज लोणारी यांनी आक्षेप घेतला. मंत्री संजय सावकारे हे स्वतःच्या कामाच्या आणि राजकीय योगदानाच्या बळावर मंत्री झाले असून, ते पक्षाशी निष्ठावान आहेत. चौधरी यांनी मंत्र्यांबाबत केलेली वक्तव्ये त्यांच्या संस्कारांचे दर्शन घडवितात, असा टोला त्यांनी लगावला. संजय सावकारे दोन महिन्यांत घरी जातील, या चौधरी यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. चौधरी यांच्या राजकीय विधानांना मंत्री सावकारे यांनी प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी चौधरी यांच्या राजकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आमच्या कार्यकर्त्यांना धमकावल्यास पोलीस तक्रार करणार’ मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत भाजपचे कार्यकर्ते नियमानुसार काम करीत आहेत. कोणत्याही कार्यकर्त्याला धमकावण्याचा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही. आमच्या एकाही कार्यकर्त्याला काही झाल्यास संबंधितांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाईल, असा इशारा लोणारी यांनी दिला. शहरात गुंडगिरी किंवा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले. सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतील उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह अनिल चौधरी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून स्वतःचीच राजकीय प्रसिद्धी करून घेतल्याचा आरोप लोणारी यांनी केला. संबंधित पत्रकार परिषदेत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांचे दीपक धांडे आणि गट नेते बबलू ब-हाटे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचे नमा शर्मा सह कट्टर शिवसैनिक उपस्थित नव्हते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या बैठकीला सर्वपक्षीय स्वरूप असल्याच्या दाव्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शिवसेना (शिंदे गटाचे) समाधान महाजन यांनी चौधरी यांच्या भूमिकेबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवरही लोणारी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी समाधान महाजन यांच्या विधानावर आक्षेप घेतला. संतोष चौधरी यांच्याबाबतही गंभीर आरोप पत्रकार परिषदेत युवराज लोणारी यांनी संतोष चौधरी यांच्याबाबतही गंभीर आरोप केले. मंत्रीपद मिळविण्याच्या प्रयत्नात कार्यकर्त्यांकडून सोने घेतल्याचा आणि ते अद्याप परत केले नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अनिल चौधरी हे एका आमदाराच्या निवासस्थानी कामे करतात, अशी वैयक्तिक टीकाही त्यांनी केली. मात्र या सर्व आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. चौधरी कुटुंबातील कथित दुबार नोंदींचा मुद्दा उपस्थित पत्रकार परिषदेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीतील कथित दुबार नोंदींचा मुद्दाही उपस्थित केला. भाग क्रमांक ६३ मधील संतोष छबिलदास चौधरी आणि रेखा संतोष चौधरी यांच्या नावांसंदर्भात दुबार नोंदी असल्याचा दावा करण्यात आला. रेखा संतोष चौधरी यांचे नाव मतदार यादीत ४२० क्रमांकावर असल्याचे सांगत या नोंदींची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली. मतदार यादीतील संबंधित नोंदींची निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत पडताळणी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. दरम्यान, संबंधित नोंदी खरोखरच दुबार आहेत किंवा त्यामागे कोणतीही बेकायदेशीर कृती झाली आहे का, हे अधिकृत पडताळणीनंतरच स्पष्ट होणार आहे. ‘नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये’ मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेबाबत शहरात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत लोणारी यांनी नागरिकांना आवाहन केले की, खऱ्या मतदारांनी कोणतीही भीती बाळगू नये. बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करीत आहेत. पात्र मतदारांचे नाव वगळले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला सहकार्य करावे. भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या पत्रकार परिषदेला प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे, महेंद्र ठाकूर, निक्की बतरा, भाजप शहराध्यक्ष किरण कोलते, विशाल नाटकर, सविता मकासरे, विलास सातदिवे, आशिष पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी अनिल चौधरी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, या राजकीय संघर्षात मतदारांचे हक्क अबाधित राहणे आणि मतदार यादीची पडताळणी पारदर्शकपणे होणे, हेच महत्त्वाचे ठरणार आहे.



