भुसावळमध्ये ‘सोनसकाळ सुरांची दिवाळी पहाट’ रंगली; सुरेल गीतांनी रसिक मंत्रमुग्ध : जय मातृभूमी मंडळाचा संगीताचा सुरेल उपक्रम; नामवंत कलाकारांच्या गायनाने दिवाळी पहाट झाली संगीतमय

भुसावळ (प्रतिनिधी )- दिवाळीच्या मंगलमय पर्वात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सुरांची बरसात आणि संगीताची अविस्मरणीय मेजवानी भुसावळकरांना अनुभवायला मिळाली. जय मातृभूमी मंडळाच्या वतीने जय मातृभूमी चौक, प्रोफेसर कॉलनी येथे ‘सोनसकाळ सुरांची दिवाळी पहाट’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिक आणि संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, मनोज बियाणी, नगरसेवक किरण कोलते, महिला प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, संगीता बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळीच्या पहाटेला संगीताच्या माध्यमातून आनंदाची अनुभूती देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात नामवंत कलाकारांनी आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांची मने जिंकली. पियुष चिंचोलकर, किरण सोहळे, डॉ. विजय शास्त्री आणि प्राजक्ता केदार यांच्यासह अन्य कलाकारांनी विविध गीतांचे बहारदार सादरीकरण केले.

संगीत वाद्यांच्या सुरेल साथीने सादर झालेल्या जुन्या-नव्या गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात स्वरांची मैफल अनुभवताना उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती.

दिवाळीचा उत्साह, सुरेल संगीताची मैफल आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे ‘सोनसकाळ सुरांची दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम भुसावळकरांसाठी आनंददायी आणि अविस्मरणीय सांगीतिक पर्व ठरला. जय मातृभूमी मंडळाच्या या उपक्रमातून दिवाळी सणाचा आनंद संगीताच्या माध्यमातून अधिक द्विगुणित झाला.