भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येवर नगरसेवक राज चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. “प्रभागातील पथदिवे बंद असल्यामुळे जनतेला आम्हाला उत्तरे द्यावी लागत आहेत. नागरिकांच्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार अधिकाऱ्यांनी गांभीर्याने केला पाहिजे. पथदिव्यांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ती मार्गी लावावी,” अशा शब्दांत नगरसेवक राज चौधरी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांच्या विविध समस्या, प्रलंबित कामे तसेच आवश्यक विकासकामांचे विषय सभागृहात मांडण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांसोबत या विषयांवर सकारात्मक चर्चा करून प्रभागातील समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी करण्यात आली. प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक राज चौधरी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने हलगर्जीपणा न करता तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


