स्व. राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालयात मान्यवरांकडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन भुसावळ (प्रतिनिधी) : भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील नसरवांजी फाईल परिसरातील स्व. राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय येथे शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष मोहम्मद मुनव्वर खान यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही दोन्ही महान नेत्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रवीणभाऊ सुरवाडे, काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, ॲड. कैलास शेळके, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष अहमद इब्राहिम कुरेशी, भुसावळ काँग्रेस शहराध्यक्ष, इस्माईल पहलवान, संजय खडसे, अनवर तडवी, रमजान खाटीक, सोहेल गवली आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमातून देशाच्या एकात्मतेसाठी, लोकशाही मूल्यांसाठी आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या या महान नेत्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. सदर माहिती रहीम कुरेशी यांनी कळविली आहे.


