दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक विम्याची थकीत रक्कम जमा करा! केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश ; जळगाव येथे शेतकऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक; प्रधानमंत्री फळपीक विमा योजना २०२५-२६ मधील प्रलंबित भरपाई तातडीने वितरित करण्याच्या सूचना


जळगाव येथे शेतकऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक; प्रधानमंत्री फळपीक विमा योजना २०२५-२६ मधील प्रलंबित भरपाई तातडीने वितरित करण्याच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री फळपीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळणे बाकी असलेली विमा भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आज जळगाव येथे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संबंधित शेतकरी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेतली. या बैठकीत प्रधानमंत्री फळपीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रलंबित विमा भरपाईचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करण्यात आला.

हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध कारणांमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक पात्र शेतकऱ्यांची विमा भरपाईची रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतीसाठी झालेला खर्च, वाढती आर्थिक अडचण आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विम्याची रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर रक्षाताई खडसे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून प्रलंबित विमा दाव्यांची माहिती जाणून घेतली. पात्र शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित राहू नयेत आणि विमा भरपाईची रक्कम विनाविलंब वितरित करण्यात यावी, यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दिवाळीपूर्वी भरपाई देण्यावर भर

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी दिवाळीपूर्वीच प्रलंबित विमा भरपाईची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी दिले.

यावेळी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही सुरू असून, लवकरात लवकर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर विमा भरपाईची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती दिली.

या बैठकीमुळे प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेअंतर्गत भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आता विमा कंपनीकडून दिलेल्या आश्वासनानुसार दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या खात्यांवर भरपाईची रक्कम जमा होते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.