जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात बुधवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, तिच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेचे रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. या संबंधांना रोहनचा भाऊ अनिकेत याचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संबंधित महिला आणि रोहन हे दुचाकीवरून जुन्या बसस्थानक परिसरातून जात असताना अनिकेतने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात महिलेच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने ती जखमी झाली. शहर पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपी फरार असल्याची माहिती असून, त्यांचा शोध सुरू आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, घटनेत संबंधित व्यक्तींची भूमिका काय होती आणि गोळीबारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. शहरातील जुन्या बसस्थानकासारख्या मध्यवर्ती भागात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून गोळीबारामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.


