कामगार पाल्यांनो, आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करा – दीपनगर केंद्र संचालक किशोर पाटील यांचे आवाहन; विविध १० योजनांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा ;

अर्ज न केल्यास आर्थिक लाभापासून वंचित राहण्याची शक्यता; त्रुटीविरहित अर्ज असल्यास ४५ दिवसांत लाभाची रक्कम खात्यात जमा

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी आणि आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता public.mlwb.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दीपनगर केंद्राचे केंद्र संचालक किशोर पाटील यांनी केले आहे.

कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळावी तसेच आरोग्य, क्रीडा, साहित्य लेखन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. मात्र, पात्र असूनही अनेक कामगार पाल्यांकडून वेळेत अर्ज केला जात नसल्याने ते योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधितांनी योजनांची माहिती घेऊन त्वरित अर्ज करावेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

या १० योजनांचा घेता येणार लाभ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत पात्रतेनुसार खालील योजनांसाठी अर्ज करता येणार आहेत.

१. शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना
२. एमएससीआयटी अर्थसहाय्य योजना
३. टंकलेखन अर्थसहाय्य योजना
४. फोर व्हीलर वाहन प्रशिक्षण अर्थसहाय्य योजना
५. गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य योजना
६. परदेश शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना
७. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना
८. क्रीडा शिष्यवृत्ती योजना
९. साहित्य लेखन अर्थसहाय्य अनुदान योजना
१०. एमपीएससी, यूपीएससी व पीएचडी पूर्व परीक्षा उत्तीर्ण सहाय्यता योजना.

त्रुटीविरहित अर्ज असल्यास ४५ दिवसांत आर्थिक लाभ

योजनांसाठी अर्ज करताना लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अर्जातील माहिती अचूक भरून सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे जोडावीत. अर्जात कोणत्याही त्रुटी नसल्यास ४५ दिवसांच्या आत आर्थिक लाभाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होते, अशी माहिती केंद्र संचालक किशोर पाटील यांनी दिली.

लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्याने अर्जदाराचे बँक खाते चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. बँक खाते कार्यरत ठेवण्याची जबाबदारी संबंधित अर्जदाराची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अधिक माहितीसाठी दीपनगर केंद्राशी संपर्क साधा

कामगार पाल्यांना अर्ज प्रक्रियेत काही अडचणी आल्यास किंवा योजनांबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच public.mlwb.in या संकेतस्थळावर योजनांची सविस्तर माहिती घेऊन पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज करावा.

“कामगार पाल्यांनी उपलब्ध आर्थिक सहाय्याच्या संधी गमावू नयेत. मंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन शिक्षण, आरोग्य आणि करिअर अधिक सक्षम करावे,” असे आवाहन केंद्र संचालक किशोर पाटील यांनी केले आहे.